Iran US War : गेल्या एका महिन्यापासून अमेरिका-इराण युद्ध सुरू आहे. या युद्धाची झळ जगातील अनेक देशांना बसली आहे. युद्धामुळे पश्चिम आशियात अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीमध्येही तणाव असल्यामुळे कच्च्या तेलाच्या निर्यातीत अडथळे येत आहेत. त्यामुळे याचा परिमाण इंधन आणि गॅसच्या पुरवठ्यावर होत आहे.

अमेरिका-इराण युद्धाचा फटका भारतातील अनेक लघु, सूक्ष्म उद्योगांनाही बसत आहे. सध्या पक्क्या मालाची निर्यात आणि कच्च्या मालाच्या आयातीला अडचणी येत असल्यामुळे युद्धाच्या झळा काही कंपन्यांनाही सोसाव्या लागत आहेत. अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम भारतातील कंडोम उद्योगावरही होत असल्याची माहिती समोर आली आहे.

कंडोम बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची टंचाई निर्माण होत असल्याने कंडोमच्या किंमती ५० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. एचएलएल लाइफकेअर आणि मॅनकाइंड फार्मा या सारख्या प्रमुख कंपन्यांना कच्च्या मालाच्या किंमतीत झालेल्या वाढीचा सामना करावा लागत आहे. कंडोम बनवणाऱ्या कंपन्यांना अमोनिया आणि सिलिकॉन ऑइलच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

तज्ञांच्या मते बाजारात अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं असल्यामुळे कंडोमच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. भारतात वार्षिक ४०० कोटींहून अधिक युनिट्सचं उत्पादन करणारा कंडोम उत्पादन उद्योग सध्या कच्च्या मालाच्या तुटवड्याचा आणि वाढत्या उत्पादन खर्चाचा सामना करत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अंदाजे २२१ कोटी कंडोमचं उत्पादन करणारी एचएलएल लाइफकेअर लिमिटेड आणि मॅनकाइंड फार्मा लिमिटेड आणि क्युपिड लिमिटेड यांसारख्या प्रमुख कंपन्या सध्या अमोनिया आणि सिलिकॉन ऑइलच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, कंडोमचं उत्पादन हे सिलिकॉन ऑइल आणि अमोनिया या दोन महत्त्वाच्या घटकांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. मात्र, याचाच मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बाजारात प्रचंड अनिश्चितता निर्माण झाली आहे.