Girish Kuber Analysis on Israel-Iran War impact on India: अमेरिका विरुद्ध इराण किंवा इस्रायल विरुद्ध इराण या युद्धामुळे गेल्या महिन्याभरात आखाती देशांमध्ये आणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे. अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणमधील परिस्थिती गंभीर बनली आहे. त्याचवेळी इराणनंदेखील इस्रायलमध्ये व इतर ठिकाणच्या अमेरिकेच्या तळांवर जोरदार हल्ले चढवले. दुबईतदेखील इराणनं केलेल्या हल्ल्यांमुळे मोठं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर जागतिक इंधनपुरवठ्याप्रमाणेच वेगवेगळ्या शेअर बाजारांवरही विपरीत परिणाम झाले. पण त्याचवेळी आंतरराष्ट्रीय समीकरणंदेखील मोठ्या प्रमाणावर बदलतील, असं विश्लेषण लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केलं आहे. यात प्रामुख्याने अमेरिकेची पत घसरणे, पाकिस्तानचं महत्त्व वाढणे आणि भारतासाठी चीननं मोठं आव्हान उभं करणे अशा बाबींचा समावेश आहे.

लोकसत्तातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मुक्तसंवाद’ कार्यक्रमात बोलताना गिरीश कुबेर यांनी अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे जागतिक पातळीवरच्या राजकीय समीकरणांवर कशा प्रकारे परिणाम होतील? याचं यावेळी सविस्तर विश्लेषण केलं. त्याचवेळी या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतानं घेतलेल्या भूमिकेमुळे आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणांवर, इराण किंवा पाकिस्तान किंवा चीन यांच्याशी असणाऱ्या संबंधांवर कसा परिणाम होऊ शकेल, यावरदेखील त्यांनी मुद्देसूद भाष्य केलं.

युद्धानंतर जगभरातली समीकरणं बदलणार!

सध्या आखाती भागात चालू असलेल्या युद्धात अमेरिका, इस्रायल व इराण हे तीन देश गुंतलेले असले, तरी युद्धानंतर त्याचा परिणाम जागतिक समीकरणांवर मोठ्या प्रमाणावर होईल, असं मत गिरीश कुबेर यांनी व्यक्त केलं. “या युद्धानंतर फक्त पश्चिम आशियाच नाही, तर जगभरातली समीकरणं बदलतील. या युद्धात अमेरिकेचीही अडचण करता येऊ शकते, हे जगाला दिसून आलं आहे. याचं सर्वात मोठं श्रेय डोनाल्ड ट्रम्प यांनाच द्यावं लागेल. कारण स्वत:च्या देशाचा बाहेरून कुणी एवढा अपमान केला नव्हता. त्यामुळे अमेरिकेचं महत्त्व अर्थातच राहणार नाही. जी पुण्याई गेल्या ३०० वर्षांपासून त्या देशानं जमवत आणली होती, अमेरिकेनं एखाद्या गोष्टीची दखल घेणं याचा चांगला अर्थ घेतला जात होता, ते सगळं गेलं. म्हणजे हा अध्यक्ष काहीही करू शकतो आणि त्याला कुणीही आव्हान देऊ शकतं या पातळीवर हे सगळं आलं आहे”, असं म्हणत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकांवर बोट ठेवलं आहे.

us-israel-iran-10-ceasfire-points

युद्ध आखातात, पण भारतासाठी मोठा धोका म्हणजे…

दरम्यान, हे युद्ध इस्रायल-इराण किंवा अमेरिकेचं असलं, तरी त्यातून भारतासाठी चीनचा सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे, असं गिरीश कुबेर एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाले. “या सगळ्यात आपल्यासाठी महत्त्वाचा ठरणारा धोका म्हणजे या सगळ्यात चीनचं महत्त्व वाढणार. चीन बडबड करणाऱ्यांचा देश नाहीये. तो शांतपणे मागे राहून काम करत असतो. आत्ताही तेच दिसून आलं. मग ते एआयचं आव्हान असेल किंवा विजेवर चालणाऱ्या मोटारींचं आव्हान असेल किंवा अभियांत्रिकीचं आव्हान असेल. त्यामुळे मुत्सद्देगिरीचा जागतिक नकाशाच बदलणार आहे”, असं ते म्हणाले.

पाकिस्तानचं महत्त्व वाढणार, भारतासाठी चिंता

मध्यस्थीच्या एकूणच प्रकरणामुळे पाकिस्तानचं महत्त्व आगामी काळात वाढणार असल्याचं ते म्हणाले. “इथे फक्त पाकिस्तानची मध्यस्थी झालेली नाही. युद्धबंदीची चर्चाच त्या दलालाच्या भूमीत होणार आहे. ती चर्चा यशस्वी होऊ नये असं आपल्याला म्हणता येणार नाही. दुसरीकडे ती यशस्वी झाली तर त्याचं कितपत कौतुक करायचं यालाही मर्यादा आहे. त्यामुळे या युद्धात पाकिस्तानची भूमिका अशी अचानकपणे समोर येणं हे आपल्यासाठी तितकं चांगलं नाहीये. त्यामुळे सगळीच समीकरणं बदलतील. शिवाय, जर ऑक्टोबरच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला, तर सगळंच चित्र बदलेल”, अशा शब्दांत गिरीश कुबेर यांनी पाकिस्ताननं मध्यस्थी करण्याबाबत विश्लेषण केलं.

भारताची तटस्थता काही खरी नाही – गिरीश कुबेर

“तटस्थता हा भाबडा शब्द आहे. मला काहीच करायचं नाहीये तर मी तटस्थ आहे असंही म्हणता येईल. पण जेव्हा संघर्ष होत असतो, कुणीतरी कुणावरतरी अन्याय करत असेल तर तुम्ही काहीतरी भूमिका घ्यायलाच हवी. त्यामुळे भारताची ही तटस्थता खरी नाहीये. शिवाय आता अमेरिकेला जसे आपली महासत्ता म्हणून विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागतील, तसंच भारतालाही आपण इराणसाठी अजूनही तितकेच विश्वासार्ह आहोत, असं सिद्ध करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागतील. आपल्याला इराणला ते वारंवार सिद्ध करून दाखवावं लागेल”, अशी गरज गिरीश कुबेर यांनी यावेळी व्यक्त केली.

“आपल्यासाठी पाकिस्तान तसेच चीनसाठी आपण”

दरम्यान, भारत, पाकिस्तान व चीन या तीन देशांमधील संबंधांचं गणितदेखील गिरीश कुबेर यांनी यावेळी उलगडून सांगितलं. “आपण जसं पाकिस्तानला मानतो, त्यांना खिजगणतीतही धरत नाही, तसं चीन आपल्याला मानत असतो. त्यामुळे आपण स्वत:बद्दल फार भ्रम बाळगायचं कारण नाही. ‘आपलं गणित चांगलंय आणि आपलं खरं आव्हान आईनस्टाईन आहे’ असं बोलणं जितकं विनोदी ठरेल, तितकंच आपल्यासाठी चीन आव्हान आहे हे म्हणणं ठरेल. कारण फक्त संख्यात्मक तुलना केली तरी आपण चीनच्या तुलनेत कुठेच नाहीत. चीनला माहिती आहे की आपली खरी लढाई अमेरिकेशी आहे. आपल्यासाठी चीन महत्त्वाचं आव्हान आहे. पण चीनसाठी आपण तसं आव्हान आहोत का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे”, असं त्यांनी नमूद केलं.