US-Israel Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धाला २० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्यापही हे युद्ध थांबलेलं नाहीये. अमेरिका-इस्रायल रोज इराणवर हल्ले करत आहेत, तर इराणही प्रतिहल्ले करत आहे. या युद्धात आतापर्यंत इराणच्या अनेक मोठ्या नेत्यांचा आणि लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याने इराणचं मोठं नुकसान झालं आहे. पण तरीही इराणने माघार घेतलेली नाही, उलट आता इराणने आणखी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे.

इराणने अमेरिकेवर सर्वाधिक लांब पल्ल्याचा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. इराणने हिंद महासागरातील अमेरिकेच्या डिएगो गार्सिया हवाई तळावर अनेक मिसाईल्स डागल्याची माहिती सांगितली जात आहे. या हल्ल्यामुळे अमेरिका-इस्रायललाही धक्का बसला आहे. कारण एवढ्या लांब अंतरावर इराण हल्ला करेल याचा अमेरिका किंवा इस्रायलने विचारही केला नसेल.

इराणने ब्रिटन आणि अमेरिकेच्या हवाई तळांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे इस्रायल हादरला आहे. यावरून इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेबद्दल इस्रायललाही धक्का बसला आहे. कारण इराणच्या क्षेपणास्त्रांचा पल्ला किती लांबपर्यंत आहे हे अद्याप अधिकृतपणे समोर आलेलं नाही. इराणने डिएगो गार्सिया हवाई तळावर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने तेहरानवरील हल्ले आणखी वाढवण्याची धमकी दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

इस्रायलची इराणला पुन्हा धमकी

इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅरेट्झ यांनी शनिवारी म्हटलं की, “येत्या काही दिवसांत इराणवरील हल्ले आणखी वाढतील.” दरम्यान, ब्रिटननेही हिंद महासागरातील यूके-अमेरिका संयुक्त हवाई तळाला लक्ष्य करण्याच्या इराणच्या प्रयत्नाचा निषेध केला आहे. डिएगो गार्सिया हवाई तळ हे इराणपासून तब्बल ४,००० किलोमीटर अंतरावर आहे.

इराणने अमेरिका-ब्रिटन तळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायल आणि अमेरिकेने शनिवारी इराणच्या नतान्झ अणुऊर्जा केंद्रावर हवाई हल्ला केला. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅरेट्झ यांनी एका व्हिडिओ निवेदनात म्हटलं की,”पुढील आठवड्यात इराणच्या सत्ताधारी राजवटीवर इस्रायल आणि अमेरिकेकडून होणाऱ्या हल्ल्यांची तीव्रता आणखी वाढेल.”