Oman Criticizes USA Foreign Policy Failure in Iran Israel War Escalation: अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात युद्ध पुकारल्यानंतर संपूर्ण जगावर त्याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळत आहेत. पश्चिम आशियातील ऊर्जा प्रकल्पावर हल्ले सुरू झाल्यामुळे कच्चे तेल आणि वायूचा पुरवठा संपूर्णपणे विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशातच अमेरिकेने विनाकारण या युद्धात उडी घेतली, असाही आरोप होत आहे. ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनीच हा आरोप केल्यानंतर आता ओमाननेही असाच आरोप केला आहे.

ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र अल्बुसैदी यांनी ‘द इकॉनॉमिस्ट’मध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले की, अमेरिकेने आपल्या परराष्ट्र धोरणावरील नियंत्रण गमावले आहे. इस्रायलने अमेरिकेला या युद्धात ओढून गंभीर चूक केली. इराणबरोबर अमेरिकेचा संभाव्य अणुकरार होत असतानाही हा संघर्ष सुरू झाला.

इराणविरोधातील युद्धात आखाती प्रदेशातील अनेक देश अमेरिकेच्या बाजूने आहेत. मात्र आता युद्ध लांबल्यामुळे आणि इराण-इस्रायलने एकमेकांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य केल्यामुळे इतर देश याबद्दल बोलू लागले आहेत. अमेरिकेने विनाकारण युद्धात उडी घेतल्याचा आरोप पहिल्यांदा डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी जो केंट यांनी केला होता. त्यांनी अमेरिकेच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता.

ओमानचे परराष्ट्र मंत्री अल्बुसैदी म्हणाले, फेब्रुवारीमध्ये जिनिव्हा येथे झालेल्या अणुचर्चेदरम्यान इराण आणि अमेरिका कराराच्या जवळ पोहोचले होते. या माध्यमातून शांतता शक्य झाली होती. मात्र प्राथमिक चर्चेनंतर काही तासांतच अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले केले. हा धक्का होता, पण अनपेक्षित नव्हते.

अल्बुसैदी पुढे म्हणाले, निर्बंध शिथिल करण्याच्या बदल्यात इराणने युरेनियम संवर्धनावर मर्यादा आणण्यावर सहमती दर्शवली होती. पुढील चर्चा नियोजित होती, पण त्यानंतर लगेचच लष्करी कारवाई करण्यात आली. हे अमेरिकेचे युद्ध नाही. या युद्धातून असे कोणतेही साध्य समोर येणार नाही, ज्यातून अमेरिका आणि इस्रायल यांचा उद्देश पूर्ण होईल.

युद्धाला विनाशकारी असे नाव

अल्बुसैदी यांनी या युद्धाला विनाशकारी असे संबोधले आहे. विशेष करून इराणने आखाती प्रदेशातील देशांना प्रत्युत्तरा दाखल लक्ष्य केल्यामुळे त्यांच्यासाठी ही भयंकर आपत्ती ठरत आहे. इस्रायल आणि अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायदे मोडले असून त्यांनी इराणवर केलेला हल्ला अवैध आहे. या अल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय कायदे मोडले गेले आहेत.