काँग्रेसचे माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी अमेरिकेतून नोंदवलेली निवडणूक निरीक्षणे

अमेरिकेमध्ये ‘काँग्रेस’च्या दोन्ही सभागृहांच्या (‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज’ आणि ‘सिनेट’) सार्वत्रिक निवडणुकांची धामधूम सध्या सुरू आहे. विविध संस्था आणि माध्यमांनी केलेल्या सर्वेक्षणांतून या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाविरोधात मोठे वातावरण असल्याचे दिसते. डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते राजकीय सुनामीचे भाकीत वर्तवत आहेत. मात्र, सर्वेक्षणांचे निष्कर्ष चुकूही शकतात. असे असताना तुम्हाला एवढा आत्मविश्वास कसा, असा प्रश्न एका डेमोक्रॅट नेत्याला विचारला असता, तो उत्तरला : कारण आमचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार नाहीत!

अमेरिकेतील रिवाजानुसार या निवडणुका विद्यमान अध्यक्षांच्या कारकिर्दीच्या मध्यावर, नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या मंगळवारी होत असतात. त्यानुसार त्या येत्या ३ नोव्हेंबर रोजी होत आहेत. २०२४च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (मागा) ही आकर्षक घोषणा दिली होती. त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचे विश्लेषण आपण कसे कराल, असे एका अमेरिकी राजकीय विश्लेषकास विचारले असता, क्षणातच त्याने, ‘मागा’ म्हणजेच तुमच्याकडचे ‘अच्छे दिन’, असे मार्मिक उत्तर दिले.

इराण युद्धाचे अमेरिकी अर्थव्यवस्थेवरील परिणाम, त्यामुळे झालेली पेट्रोलदरातील वाढ, वाढलेली महागाई, आरोग्यविषयक खर्चातील वाढ, ट्रम्प  सरकारचा एकूण कारभार आणि ‘इमिग्रेशन’ (स्थलांतर) या काही मुद्द्यांभोवती ही निवडणूक फिरू लागली आहे. इराण युद्धामुळे अमेरिकी नागरिकांना सगळ्यात मोठा फटका बसला आहे तो पेट्रोल दरवाढीचा. गेल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास अमेरिकेत नियमित दर्जाचे पेट्रोल लिटरला सुमारे ७३ रुपये (गॅलनला ३.५ डॉलर) होते. आज ते लिटरला जवळपास ९५ रुपयांपर्यंत गेले आहे.

अनुषंगाने, खाद्य व ऊर्जा क्षेत्रातील किमती अडीच टक्क्यांनी महागल्या आहेत. घरगुती विजेचे बिल सरासरी तीन ते पाच टक्क्यांनी, तर औद्योगिक वीजबिल सात ते दहा टक्क्यांपर्यंत वाढले आहे. घरभाडी सरासरी तीन टक्क्यांनी वाढली आहेत. महागाई निर्देशांक वर्षभरात साडेतीन टक्क्यांनी वाढला आहे. रुग्णालयसेवेचा खर्च गेल्या महिन्याभरात एक टक्क्याने, तर वर्षभरात पाच टक्क्यांनी वाढला आहे. यास अपवाद औषधांच्या किमतींचा. त्या दोन टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. नोकरदार वर्गाच्या पगारात मात्र जेमतेम तीन टक्के वाढ झाली आहे. थोडक्यात, एकीकडे कमी पगारवाढ आणि दुसरीकडे महागाई, अशा कात्रीत अमेरिकी जनता सापडली आहे.

याचबरोबर या निवडणुकीत एक अनपेक्षित आणि धक्कादायक मुद्दा जोर धरताना दिसत आहे. हा मुद्दा आहे ‘डेटा सेंटर्स’ म्हणजेच विदा केंद्रांचा. आज कृत्रिम प्रज्ञेच्या (एआय) विश्वात ‘चॅट-जीपीटी’, ‘जेमिनी’, ‘क्लॉड’ यांसारख्या अनेक ‘चॅटबॉट्स’चा वापर वाढत चालला आहे. अशा बाबींमुळे अमेरिकेमध्ये विविध ठिकाणी विदा केंद्रे उभारावी लागणार आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनींबरोबरच अतिरिक्त ऊर्जा आणि भरमसाठ पाणी यांची आवश्यकता भासणार आहे. ही केंद्रे उभारण्यासाठी प्रचंड खर्च अपेक्षित आहे. युद्धामुळे ताणल्या गेलेल्या अर्थव्यवस्थेत भविष्यात हे कसे झेपणार, हा प्रश्न या क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित करीत आहेत.

अमेरिकेत सध्या दर आठवड्याला विविध संस्था, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि वर्तमानपत्रांद्वारे सर्वेक्षणांचे अंदाज प्रसिद्ध केले जात आहेत. या सर्वेक्षणांच्या निष्कर्षांचा आणि आकडेवारीचा रिपब्लिकन उमेदवारांनी मोठा धसका घेतल्याचे दिसते. कोणतीही जोखीम पत्करायला नको म्हणून त्यांनी डॉलरच्या राशी ओतण्यास सुरुवात केल्याचे दिसते. त्यांच्या खर्चाची आकडेवारी भारतातील काही छोट्या राज्यांच्या अंदाजपत्रकापेक्षाही कितीतरी पटींनी जास्त आहे.

उत्तर कॅरोलायना राज्यात डेमोक्रॅट पक्षाची उमेदवारी दोन वेळा राज्यपाल (गव्हर्नर) राहिलेल्या रॉय कूपर यांना मिळताच, रिपब्लिकन पक्षाने तेथे दूरचित्रवाणीवर अंदाजे २९० कोटी रुपयांच्या जाहिराती प्रसारित केल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवर, डेमोक्रॅट पक्ष उमेदवारांवर सरासरी ४८० कोटी रुपये खर्च करीत असल्याचा अंदाज आहे. याउलट, रिपब्लिकन पक्षाचा खर्च तीन हजार कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे भौगोलिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे कॅन्सस राज्य व ‘वेस्टर्न’पटांमुळे प्रसिद्धीस पावलेले टेक्सास राज्य येथे प्रस्तुत लेखकाचे यापूर्वी वास्तव्य होते.

ही दोन्ही राज्ये म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले. विठ्ठलराव गाडगीळ नेहमी म्हणत, की पुण्यातील शनिवार, नारायण, सदाशिव या पेठांतून काँग्रेसने ब्रह्मदेवाला उभे केले, तरी तो निवडून येणार नाही. अशीच परिस्थिती कॅन्ससझ्र्टेक्सासची. १९३२ पासून येथे कधीही डेमोक्रॅट खासदार निवडून आलेला नाही. मात्र, अमेरिकी सरकारच्या तीन लाख टन गोमांस आयात करण्याच्या- तेही विना ‘टॅरिफ’- निर्णयामुळे कॅन्सस, ओक्लाहोमा, नेब्रास्का यांसारख्या कृषिप्रधान राज्यांतील शेतकरीवर्गात मोठी नाराजी पसरली आहे. या बहुतांश राज्यांतून ट्रम्प यांनी गेल्या निवडणुकीत मुसंडी मारली होती. तेथे आता डेमोक्रॅट हळूहळू पुढे सरकत आहेत, असे सर्वेक्षणांत प्रकर्षाने दिसू लागले आहे.