वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत मंगळवारी प्रतिनिधिगृहाच्या सर्व ४३५ जागांसह सेनेटच्या एक तृतीयांश जागांसाठी मतदान होणार आहे. काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांवर रिपब्लिकन पक्षाचे नियंत्रण असून डेमोक्रॅटिक पक्षाने त्यांना मात दिल्यास ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयांना आणि विधेयकांना अडथळे निर्माण होऊ शकतात. दुसरीकडे, सेनेटवरील नियंत्रण गमावल्यास अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या उर्वरित दोन वर्षांच्या कार्यकाळात महत्त्वाच्या नियुक्त्या करणेही कठीण होणार आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहांवरील वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान रिपब्लिकन पक्षासमोर आहे.
काँग्रेसची द्वि-सभागृह रचना
काँग्रेसमध्ये प्रतिनिधिगृह (हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्ज) आणि सेनेट या दोन सभागृहांचा समावेश आहे. प्रतिनिधिगृहाची तुलना लोकसभेशी करता येते. या सभागृहाचे सदस्य मतदारसंघांतून निवडले जातात. सेनेटमध्ये राज्यांचे प्रतिनिधित्व असते. प्रत्येक राज्यातून लोकसंख्येचा विचार न करता दोन सेनेटर निवडले जातात. अमेरिकेतील सेनेटर थेट जनतेतून निवडले जातात. प्रतिनिधिगृहाचे सदस्य दोन वर्षांसाठी, तर सेनेटचे सदस्य सहा वर्षांसाठी निवडले जातात. सेनेटच्या सुमारे एकतृतीयांश सदस्यांना दर दोन वर्षांनी मतदारांना सामोरे जावे लागते. अध्यक्षपदाच्या दोन निवडणुकांच्या मध्यावधीत होणाऱ्या या निवडणुकांना ‘मध्यावधी निवडणुका’ (मिडटर्म इलेक्शन्स) असे म्हणतात.
सेनेटची निवडणूक
सेनेटचे संख्याबळ १०० इतके आहे. त्यापैकी ३५ जागांवर मतदान आहे. यापैकी ३३ नियमित आहेत आणि दोन ठिकाणी पोटनिवडणुका होत आहेत. फ्लोरिडा आणि ओहायोमध्ये अनुक्रमे मार्को रुबिओ आणि जे. डी. व्हान्स यांच्या सेनेटच्या जागा रिक्त झाल्याने या पोटनिवडणुका होत आहेत. बहुमतासाठी ५१ जागा आवश्यक आहेत. सेनेटवरील नियंत्रण कायम राखण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला आवश्यक आहेत. समसमान मतदान झाल्यास उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांना निर्णायक मत देता येते.
सभागृहांची आकडेवारी
४३५ : प्रतिनिधिगृहाचे संख्याबळ
२१९ : रिपब्लिकन पक्ष (यात एका अपक्षाचा समावेश).
२१४ : डेमोक्रॅटिक पक्षाकडे. दोन जागा रिक्त.
बहुमतासाठी २१८ जागा आवश्यक
१०० : सेनेटचे संख्याबळ
५३ जागा : रिपब्लिकन पक्ष
४७ जागा : डेमोक्रॅटिक पक्षाकडे (यात दोन अपक्षांचा समावेश)
बहुमतासाठी ५१ जागा आवश्यक
०००००००००
– ३६ राज्यांत गव्हर्नरपदासाठी निवडणुका आहेत.
– ३ अमेरिकी प्रदेशांमध्येही गव्हर्नरपदाच्या निवडणुका
या निवडणुकीचे महत्त्व काय?
– प्रतिनिधिगृहावरील नियंत्रण : प्रतिनिधिगृहात डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत आल्यास रिपब्लिकन पक्षाची विधेयके रोखता येतील. तसेच समित्यांच्या सुनावण्या आणि चौकशीच्या माध्यमातून ट्रम्प प्रशासनाच्या कामकाजावर लक्ष ठेवता येईल. अर्थसंकल्पावरील चर्चा अधिक संघर्षपूर्ण होण्याची शक्यता आहे.
– सेनेटचे महत्त्व : सर्वोच्च न्यायालय आणि प्रशासनातील वरिष्ठ पदांवरील नियुक्त्यांना मंजुरी देण्याचा किंवा त्या नाकारण्याचा अधिकार सेनेटकडे आहे. सेनेटवरील नियंत्रण गमावल्यास ट्रम्प यांना नियुक्त्या करताना अडचणी येऊ शकतात.
– अध्यक्षपदावर परिणाम नाही : काँग्रेसमध्ये विजय मिळवला तरी डेमोक्रॅटिक पक्षाला अध्यक्षपद मिळणार नाही. ट्रम्प यांच्याकडे नकाराधिकार (व्हेटो) आणि कार्यकारी अधिकार कायम राहतील.
०००००००००००००००
निवडणुकीत कोणते मुद्दे केंद्रस्थानी?
डेमोक्रॅट्स पक्ष – इराण युद्धावरील खर्च, इराण युद्धामुळे डिझेलच्या वाढलेल्या किंमती, महागाई, ट्रम्प यांची कामगिरी
रिपब्लिकन पक्ष – ट्रम्प यांच्या स्थलांतरविषयक धोरणांचे समर्थन, डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रस्तावांवर टीका
अंदाज काय आहेत?
निवडणुकीच्या अलीकडील अंदाजांनुसार प्रतिनिधिगृहाच्या लढतीत डेमोक्रॅटिक पक्षाला आघाडी मिळण्याची शक्यता आहे.
आतापर्यंतचा इतिहास काय सांगतो?
– अमेरिकेत मध्यावधी निवडणुकांमध्ये अध्यक्षांच्या पक्षाला सहसा फटका बसतो. १९३४ ते २०२२ या काळातील २३ मध्यावधी निवडणुकांपैकी केवळ तीन वेळा (१९३४, १९९८ आणि २००२) अध्यक्षांच्या पक्षाने प्रतिनिधिगृहातील जागा वाढवल्या.
– प्रतिनिधिगृह आणि सेनेटमधील निवडणुकांचे निकाल वेगवेगळे लागू शकतात. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील २०१८च्या मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने प्रतिनिधिगृहातील ४१ जागा गमावल्या; मात्र सेनेटमध्ये दोन जागा वाढवल्या.
– अलास्कातील निवडणुकीचा अंतिम निकाल उशिरा लागू शकतो. पात्र मतपत्रिकांची तपासणी आणि मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर १८ नोव्हेंबरपर्यंत प्राधान्यक्रमानुसार मतदानाची अंतिम आकडेवारी उपलब्ध होणार नाही.
भारतीय वंशाचे चार उमेदवार पुन्हा रिंगणात
१. रो खन्ना (डेमोक्रॅटिक पक्ष)
– कॅलिफोर्नियाचा १७ वा मतदारसंघ : रिपब्लिकन उमेदवार रितेश टंडन यांच्याशी सामना.
२. सुहास सुब्रमण्यम (डेमोक्रॅटिक पक्ष)
– व्हर्जिनियाचा १०वा मतदारसंघ : रिपब्लिकन डेव्ह बेकविथ आणि अपक्ष उमेदवारांशी सामना.
३. प्रमिला जयपाल (डेमोक्रॅटिक पक्ष)
– वॉशिंग्टनचा ७ वा मतदारसंघ : रिपब्लिकनच्या निरव शेठ यांच्याशी सामना.
४. अमी बेरा (डेमोक्रॅटिक पक्ष)
– कॅलिफोर्नियाचा तिसरा मतदारसंघ : रिपब्लिकन रॉब टकर यांच्याशी सामना.
०००००००
भारतीय वंशाच्या अमेरिकी मतदारांचे महत्त्व
प्रभावक्षेत्रातील मतदारसंख्या
कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅली आणि न्यू जर्सीच्या मध्यवर्ती भागासारख्या ठरावीक क्षेत्रांत भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अटीतटीच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या मतदानाचा निकालावर परिणाम होऊ शकतो.
डेमोक्रॅटिक पक्षाकडे कल
एका सर्वेक्षणानुसार, भारतीय-अमेरिकी नागरिकांपैकी ६६ टक्के मतदारांनी प्रतिनिधिगृहासाठी डेमोक्रॅटिक पक्षाला पसंती दिली, तर १८ टक्के मतदारांनी रिपब्लिकन पक्षाला पसंती दिली. सेनेटसाठी हे प्रमाण अनुक्रमे ६६ आणि २२ टक्के होते.
व्यावहारिक मुद्द्यांना प्राधान्य
कार्नेगी-यूगोव्हच्या सर्वेक्षणानुसार, महागाई आणि वाढत्या किमती हे भारतीय-अमेरिकी नागरिकांच्या चिंतेचे प्रमुख विषय आहेत. त्यानंतर रोजगार, अर्थव्यवस्था आणि आरोग्यसेवा या मुद्द्यांचा क्रमांक लागतो. स्थलांतराचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. मात्र, केवळ दोन टक्के मतदारांनी अमेरिका-भारत संबंधांना सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा मानले.
भारतीय वंशाचे महत्त्वाचे उमेदवार
– अमिष शाह (डेमोक्रॅटिक पक्ष) : ॲरिझोनाच्या पहिल्या हाउस मतदारसंघातून उमेदवारी – पिया दांडिया (डेमोक्रॅटिक पक्ष) : फ्लोरिडाच्या २२व्या हाउस मतदारसंघातून उमेदवारी
– विवेक रामास्वामी (रिपब्लिकन) : ओहायोच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत उमेदवार
– सरिता कोमातीरेड्डी (रिपब्लिकन) : न्यूयॉर्कच्या महाधिवक्ता पदाच्या निवडणुकीत उमेदवार – नित्या रामन (डेमोक्रॅटिक पक्ष) : लॉस एंजेलिसच्या महापौरपदाच्या निवडणुकीत उमेदवार
००००००००००००००
या मतदारसंघांवर लक्ष
प्रतिनिधिगृहातील सत्तासंघर्षासाठी दहा मतदारसंघ महत्त्वाचे ठरणार आहेत. कोलोरॅडो, फ्लोरिडा, आयोवा, मेन, मोंटाना, नॉर्थ कॅरोलिना, न्यूयॉर्क, ओहायो, टेक्सास आणि वॉशिंग्टनमधील लढतींकडे विशेष लक्ष आहे. काही मतदारसंघांत फेररचनेमुळेही चुरस वाढली आहे.
