वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

इराण युद्ध, वाढती महागाई आणि ट्रम्प यांचा कारभार याबद्दल असलेल्या संतापाला अमेरिकी जनतेने मतपेट्यांमधून वाट मोकळी करून दिल्याचे मानले जात आहे. अवघ्या दोनच वर्षांपूर्वी अमेरिकी मतदारांनी ट्रम्प यांच्या मेक अमेरिका ग्रेट अगेन या घोषणेवर शिक्कामोर्तब केले होते. मात्र, इराण युद्ध आणि आयातशुल्कासंबंधी बदललेले धोरण यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला.

अमेरिकेने इराणविरोधात युद्ध करण्याची काहीही गरज नव्हती, अशी अमेरिकी जनतेची धारणा झाल्याचे गेल्या काही महिन्यांमधील जनमत चाचण्यांमधून स्पष्ट होत होते. इराण युद्धामुळे इंधनाचे दर भडकून महागाई वाढली, डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले. त्याच्या जोडीला आयातशुल्कासंबंधी सातत्याने धरसोड धोरण राबवल्यामुळे अमेरिकेमध्ये बाहेरील देशांमधून कच्चा माल येणे थांबले. त्याचा फटका तेथील लघुउद्योगांना बसला. ट्रम्प प्रशासनाने मेडिकेअरसारख्या समाजाभिमुख योजनांसाठीच्या निधीत कपात केली. परिणामी आरोग्यसेवा सर्वसामान्य नागरिकांना परवडेनाशी झाली. ट्रम्प यांनीही इराण युद्धाचा फटका बसल्याचे निकालानंतर मान्य केले.

याबरोबरच स्थलांतरितांसंबंधीच्या धोरणामुळेही अमेरिकी जनतेमध्ये ट्रम्प यांच्याविषयी वाढती नाराजी होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक स्पॅनिश भाषिक हिस्पॅनिक अमेरिकींनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता. प्रत्यक्षात अध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी मेक्सिकोमधील स्थलांतरितांविरोधात कठोर धोरण राबवले. त्यासाठी अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम्स विभागाला (आयसीई) अतिरिक्त अधिकार दिले. आयसीईने स्थलांतरितांविरोधात कथितरित्या कठोर कारवाई करताना हिंसाचार केल्याचा आरोप झाला. यामुळे स्पॅनिश भाषिकांमध्येही ट्रम्प यांच्याविषयी नाराजी वाढत होती.

एच-१बी व्हिसाधारकांसाठी अतिरिक्त शुल्क लादणे, उदारमतवादी आणि स्वतंत्र विचाराने चालणाऱ्या विद्यापीठांच्या अनुदानांमध्ये मनमानी कपात करणे या बाबीही ट्रम्प यांच्या विरोधात गेल्या.

प्रचारातील प्रमुख मुद्दे

– डेमॉक्रॅटिक पक्षाने आपला प्रचार प्रामुख्याने महागाई आणि भ्रष्टाचार या दोन मुद्द्यावर केंद्रित केला होता. तर पारलिंगी समुदायाच्या अधिकारांवरून रिपब्लिकन पक्षाने सांस्कृतिक मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. पण जनतेने त्याला महत्त्व दिले नाही.

– इलॉन मस्क यांच्यासारख्या अब्जाधीश उद्योगपतींनी कोट्यवधी डॉलर रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात खर्च केले. डेमॉक्रॅटिक पक्षाने हा मुद्दाही वारंवार उपस्थित केला. त्यांच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे जनता, असे कथानक प्रभावीपणे मांडण्यात डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांना यश आले

– रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा प्रामुख्याने ट्रम्प यांच्यावर होती. तर माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांसाठी अनेक सभा घेतल्या.