वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला धूळ चारत डेमोक्रॅटिक पक्षाने मध्यावधी निवडणुकीद्वारे अमेरिकी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमध्ये वर्चस्व स्थापित केले. इराण युद्ध, इस्रायलला मदत यांसह विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय धोरणांत एककल्ली हुकमत गाजवू पाहणार्या ट्रम्प यांना हा सर्वांत मोठा धक्का मानला जातो.
ट्रम्प यांनी ‘मीच उभा आहे, असे समजून मतदान करा’ असे जेथे आवाहन केले, त्या पारंपरिक रिपब्लिकन राज्यांतही डेमॉक्रॅटिक पक्षाने विजय मिळवला. या निकालाने अमेरिकेतील लोकशाहीवादी नागरिक आनंदाची दिवाळी साजरी करीत आहेत. ट्रम्प यांच्या या दारुण पराभवाचे आंतरराष्ट्रीय राजकारणावरही परिणाम दिसून येतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, ट्रम्प यांनी हा निकाल मान्य करतानाच, ‘मी निवडणुकीला उभा असतो, तर आमचा दणदणीत विजय झाला असता’ अशी पुस्तीही जोडली. राष्ट्राध्यक्षांच्या कामगिरीवरील सार्वमत म्हणून पाहिल्या जाणार्या या मध्यावधी निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचा पराभव अभूतपूर्व असा आहे. जॉर्जिया, टेक्सास, आयोवा, ओहायो या राज्यांतील ‘गव्हर्नर’पदाच्या निवडणुकीत अनेक वर्षांपासूनचे रिपब्लिकन वर्चस्व मतदारांनी मोडीत काढले. ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात जनतेचा संताप असे या निकालाकडे पाहिले जात आहे. त्यांच्या पक्षातील एका नेत्यानेच या संदर्भात ‘ट्रम्प पर्व संपले’ अशी प्रतिक्रिया दिली.
प्रतिनिधिगृहाचे संख्याबळ ४३५ असून बहुमतासाठी २१८ जागांवर विजय आवश्यक आहे.
सेनेटमधील पराभव अधिक महत्त्वाचा का?
सेनेट हे लोअर हाऊसपेक्षा अधिक शक्तिशाली सभागृह आहे. प्रतिनिधिगृहाच्या सदस्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो, तर सेनेटरचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. ५० राज्यांमधून १०० सेनेटर निवडले जातात, त्यामुळे प्रत्येक सेनेटर संपूर्ण राज्याचे प्रतिनिधित्व करत असल्याचे मानले जाते. फेडरल न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, कॅबिनेट सेक्रेटरी यांसारख्या अध्यक्षांनी केलेल्या महत्त्वाच्या नियुक्त्या स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार सेनेटकडे असतो. अध्यक्षांनी वाटाघाटी केलेल्या करारांना मंजुरी देण्याचा अधिकार सेनेटकडे असतो. आता या सभागृहात डेमोक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळाल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभाराला जरा तरी आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.
जवळपास दोन डझन राज्यांची डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराला पसंती
अमेरिकेतील जवळपास दोन डझन राज्यांनी यावेळी रिपब्लिकन पक्षाऐवजी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराला पसंती दिली. टेक्सास, कन्सास, आयोवा, ओहायो, मेन, नॉर्थ कॅरोलिना आणि साउथ कॅरोलिना यासारख्या रिपब्लिकन पक्षाचे पारंपरिक वर्चस्व असलेल्या राज्यांमध्येही डेमोक्रॅटिक पक्षाने मुसंडी मारली. यापैकी काही राज्यांमध्ये पिढ्यानपिढ्या रिपब्लिकन पक्षाचेच उमेदवार निवडून येत असत. या राज्यांनी दोनच वर्षांपूर्वी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना भक्कम पाठिंबा दिला होता.
मी निवडणूक लढवत नव्हतो, अन्यथा आमचा दणदणीत विजय झाला असता. डेमोक्रॅटिक पक्षाचे अभिनंदन. मी हा निकाल स्वीकारतो. आम्ही डेमोक्रॅटिक पक्षाबरोबर काम करू. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका
