वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या पराभवावर अनेक जागतिक नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. या निकालांचे जागतिक व्यापार, सुरक्षा आणि ऊर्जा किमतींवर मोठे परिणाम होऊ शकतात, अशी शक्यताही वर्तविण्यात आली.
अमेरिकी जनतेने अशा धोरणांच्या विरोधात मतदान केले, जी केवळ लोकांना गरिबीच्या खाईत लोटतात. द्वेषाच्या विरोधात, लिंगभेदाच्या विरोधात, हवामान बदलाकडे दुर्लक्ष करणाऱ्या दृष्टिकोनाच्या विरोधात आणि उच्चभ्रू वर्गाच्या विशेषाधिकारांच्या विरोधात त्यांनी कौल दिला आहे. हे ब्राझीलमध्ये घडले. आता अमेरिकेत घडले आहे. आणि लवकरच ते स्पेनमध्येही घडेल. – पेड्रो सांचेझ, पंतप्रधान, स्पेन
हा अमेरिकी मतदारांचा बदलता कल दर्शविणारा एक प्रभावी राजकीय संकेत आहे. अमेरिकी राजकारणात आता असे आवाज उमटू लागले आहेत, जे आमच्या विचारांच्या अधिक जवळचे आहेत. विशेषतः हवामान आणि पर्यावरण, परराष्ट्र धोरण आणि विकास मदत धोरणांच्या बाबतीत सध्याच्या राष्ट्राध्यक्ष आणि प्रशासनाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका जनतेने घेतली. – जोनास गहर स्टोअर, पंतप्रधान, नॉर्वे
या निकालामुळे सर्व काही आपोआप चांगले होईल, असे नाही. परंतु यामुळे युक्रेनला मिळणारा पाठिंबा, हरित संक्रमण आणि जगातील इतर देशांशी असलेले संबंध अधिक बळकट होण्यास मदत होऊ शकते.– ख्रिस्टेल शाल्डमोस, युरोपीय महासंघाच्या पार्लमेंटचे उपाध्यक्ष
राजकीय संघर्षाच्या पलीकडे जाऊन डोनाल्ड ट्रम्प आपली भूमिका बदलतील. विशेषत: पेट्रोलच्या किमतींसारख्या बाबी, ज्यांचा जनतेवर थेट परिणाम होतो, यामध्ये बदल आवश्यक असल्याचे त्यांनी मान्य केले पाहिजे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमधील त्यांचा हस्तक्षेपही ते कमी करतील किंवा करणार नाहीत. येत्या काही दिवसांत यांवर लक्ष ठेवावे लागणार आहे. – रोलँड लेस्क्युअर, फ्रान्सचे अर्थमंत्री
मला असे वाटतेय की, निवडणुकीत हस्तक्षेप करणारे माझे ‘अंतराळ लेझर’ या वेळी काम करू गेले नाहीत. – इलॉन मस्क, अमेरिकी उद्योजक
चीनची सावध भूमिका
बीजिंग : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला मिळालेल्या यशावर चीनने बुधवारी सावध प्रतिक्रिया दिली. दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये झालेली महत्त्वाची सहमती जपण्यासाठी आणि तिची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही अमेरिकेबरोबर काम करणे सुरू ठेवणार असल्याचे चीनने म्हटले आहे. अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुका ही त्यांची अंतर्गत बाब आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सांगितले. अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांकडे चीन कशा प्रकारे पाहतो, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे भाष्य केले.
