वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
अमेरिकेच्या काँग्रेस या सर्वोच्च कायदेमंडळाच्या कनिष्ठ सभागृह (हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्ज) आणि वरिष्ठ सभागृहाच्या (सेनेट) मध्यावधी निवडणुकीसाठी मंगळवारी, ३ नोव्हेंबरला मतदान होत आहे. प्रतिनिधिगृहाच्या सर्व ४३५ तर सेनेटच्या १००पैकी ३५ जागांसाठी निवडणूक होत आहे. सध्या दोन्ही सभागृहांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व आहे.
वेगवेगळ्या वृत्तसंस्था आणि माध्यमांनी केलेल्या जनमत चाचण्यांमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत मोठी घसरण झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळेलच असा खात्रीलायक अंदाज अद्याप वर्तवला गेलेला नाही. इराणचे न संपलेले युद्ध, इराण युद्धामुळे तेलाच्या भडकलेल्या किमती आणि महागाई हे मुद्दे अमेरिकी मतदारांसाठी महत्त्वाचे असल्याचे विविध जनमत चाचण्यांमधून उघड झाले आहे. याबरोबरच एप्स्टीन फाइलचा मुद्दाही ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षासाठी अडचणीचा ठरत आहे. ही निवडणूक ट्रम्प यांच्या विरोधात गेली तर त्यामुळे अमेरिकेच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची अपेक्षा आहे.
मध्यावधी निवडणुकीनंतर इराणवर पुन्हा हल्ले सुरू करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. आतापर्यंत इराण युद्धावर ४७ अब्ज डॉलर इतका खर्च झाल्याचे पेंटागॉनने जाहीर केले असले तरी, आपल्याला इराण युद्ध संपवण्याची कोणतीही घाई नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. मध्यावधीत डेमोक्रॅटिक पक्षाला काँग्रेसवर नियंत्रण मिळवण्यात यश आले तर ट्रम्प यांच्या बेधडक कारभाराला आळा बसेल अशी आशा आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळाले तर त्यांची कोणतीही योजना मंजूर होऊ देणार नाही, अशी धमकी ट्रम्प यांनी ‘द न्यूयॉर्क पोस्ट’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत दिली. त्यांनी आपल्या प्रचारामध्येही डबल इंजिन सरकारचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला आहे.
सध्याचे बलाबल
प्रतिनिधिगृहाच्या ४५३ जागांपैकी रिपब्लिकन पक्षाचे २१८ आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे २१४ सदस्य आहेत. तर एक सदस्य अपक्ष आहे. सेनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाच ५३ आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे ४५ सदस्य आहेत. दोन अपक्ष सदस्य डेमोक्रॅटिक पक्षाबरोबर आहेत. या वेळेस अमेरिकेत मतदानाच्या निर्धारित तारखेआधी ५ कोटी मतदारांनी मतदान केले असून हा विक्रमी आकडा आहे. अनेक मतदार संघांमध्ये मतदान करणाऱ्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या मतदारांची संख्या अधिक आहे.
