US Military Plane Crash Iraq News: हवेतच दुसऱ्या विमानात इंधन भरणाऱ्या अमेरिकेच्या विमानाचा इराकमध्ये अपघात झाला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने याची माहिती दिली आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान त्यांचे KC-135 हे रिफ्यूलिंग करणारे विमान कोसळले आहे. या विमानात पाच क्रू सदस्य होते.
शत्रूच्या हल्ल्याची शक्यता फेटाळली
अमेरिकन लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, एकूण दोन विमान हवेत असताना ही घटना घडली. यात दुसऱ्या विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले आहे. तर दुसरे विमान कोसळले आहे. लष्कराने सांगितले की, हा अपघात शत्रू राष्ट्राच्या हल्ल्यात झालेला नाही. सध्या बचाव कार्य सुरू असून दुर्घटनेच्या मागे काय कारणे आहेत, याचाही तपास केला जात आहे.
यूएस सेंट्रल कमांडने केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, इराणविरोधात ऑपरेशन एपिक फ्यूरी सुरू आहे. यावेळी मित्र राष्ट्राच्या हवाई क्षेत्रात सदर दुर्घटना घडली. त्यानंतर बचाव कार्य सुरू आहे.
KC-135 विमानाची युद्धातील भूमिका
अमेरिकेचे KC-135 विमान लढाऊ विमानांमध्ये हवेतच इंधन भरण्यासाठी वापरले जाते. सदर विमान अमेरिकन वायू सेनेसाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते. दूरच्या अंतरावर सुरू असणाऱ्या ऑपरेशनदरम्यान लढाऊ विमानांना हवेतच रिफ्युलिंग करण्याचे काम KC-135 करते. इराण सारख्या मोठ्या भौगोलिक क्षेत्रात युद्ध सुरू ठेवण्यासाठी अशाप्रकारची विमाने लाभदायक ठरतात. पश्चिम आशियामध्ये अमेरिका आणि इस्रायलचे लष्कर इराणविरोधात संयुक्त कारवाई करत असताना ही घटना घडली आहे.
बंडखोर गटांनी स्वीकारली जबाबदारी
इराकचा पाठिंबा असलेल्या इस्लामिक रेझिस्टन्स या सशस्त्र संघटनेच्या वतीने अमेरिकेचे KC-135 हे इंधन भरणारे विमान पाडण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, आपल्या देशाचे सार्वभौमत्व आणि हवाई क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, इराणविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईत कोसळलेले अमेरिकेचे हे चौथे विमान आहे. मागच्या आठवड्यात कुवेती सैन्याच्या गोळीबारात तीन अमेरिकन लढाऊ विमाने चुकून पाडण्यात आल्याचे अमेरिकन सैन्याने सांगितले होते.
सात सैनिक ठार
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणविरोधात युद्ध सुरू केले. या संघर्षात अमेरिकेचे सात सैनिक मारले गेले आहेत. कुवैतमधील बंदरावर इराणी ड्रोनने हल्ला केल्यानंतर सहा सैनिकांचा मृत्यू झाला होता. तर सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान हवाई तळावर झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या सातव्या सैनिकाचा मृत्यू झाला.
