अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामध्ये दोन्ही देशांना मोठी हानी सहन करवी लागली आहे. यादरम्यान या युद्धात अमेरिकेच्या झालेल्या नुकासनाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काही अमेरिकन अधिकारी आणि या परिस्थितीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने अलीकडेच केलेल्या हल्ल्यांमध्ये पर्शियन आखातातील अमेरिकेच्या लष्करी तळांचे आणि शस्त्रास्त्रांचे पूर्वी सांगण्यात आले होते त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान झाले आहे.

झालेल्या विध्वंसाची व्याप्ती आतापर्यंत जाहीरपणे उघड करण्यात आलेल्या माहितीपेक्षा कितीतरी जास्त आहे आणि या लष्करी तळांच्या दुरुस्तीसाठी अब्जावधी डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी एनबीसी न्यूजशी बोलताना दिली.

२८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यापासून इराणने या प्रदेशातील अनेक देशांमध्ये हल्ले केले आहेत. इराणने किमान सात देशांमधील महत्त्वाच्या लष्करी तळांना लक्ष्य केले, ज्यामध्ये स्टोरेज वेअरहाऊस, लष्करी कारवायांचे व्यवस्थापन जेथून चालते अशी कमांड सेंटर्स, एअरक्राफ्ट हँगर आणि सॅटेलाइट कम्युनिकेशनचा समावेश आहे.

इतकेच नाही तर इराणने रनवे, रडार सिस्टम्स इतकेच नाही तर लष्करी हालचाली आणि सर्व्हेलन्ससाठी आवश्यक असलेली विमाने देखील नष्ट केली. एका घटनेत, अमेरिकेची शक्तिशाली एअर डिफेन्स सिस्टिम तैनात असूनही, इराणचे एक जुने एफ-५ लढाऊ विमान आत शिरून हल्ला करण्यात यशस्वी झाले.

इराणच्या हल्ल्यांमुळे प्रत्यक्षात किती नुकसान झाले याबद्दलची सविस्तर माहिती अमेरिकन संरक्षण विभागाने अद्याप जाहीर केलेली नाही. इतकेच नाही तर, यूएस सेंट्रल कमांडनेही किती नुकसान झाले याबद्दल भाष्य करण्यास नकार दिला आहे.

रिपब्लिकन पक्षामधील काही खासदारांनी पारदर्शकतेच्या अभाव असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. एका सहकाऱ्याने तर असेही म्हटले की, गेल्या अनेक आठवड्यांपासून विचारणा करूनही देखील त्यांच्यासाठी अद्यापही परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही, विशेषतः अशा वेळी जेव्हा पेंटागॉनकडून बजेटमध्ये प्रचंड मोठी वाढ करण्याची मागणी केली जात आहे.

“कोणालाही काहीही माहिती नाही, आणि हे विचारलं नाही असं काही नाही. आम्ही अनेक आठवड्यांपासून विचारणा करत आहोत आणि आम्हाला काहीही ठोस माहिती दिली जात नाही. पेंटागॉन विक्रमी बजेटची मागणी करत असताना हे केले जात आहे,” असे ते म्हणाले.

ट्रम्प यांनी इराणमध्ये सुरू केलेल्या युद्धासाठी पेंटागॉन कथितपणे अमेरिकन काँग्रेसकडे २०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधीची मागणी करत आहे. संघर्षाच्या पहिल्याच आठवड्यात अमेरिकेने आपल्या लष्करी कारवायांवर ११ अब्ज डॉलर्सहून अधिक खर्च केला होता. युद्ध सुरू होण्यापूर्वी, ट्रम्प यांनी १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या डिफेन्स बजेटती मागणी केली होती, जे मागील वर्षाच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक आहे. दरम्यान, अमेरिकन काँग्रेसने २०२६ साठी ८३८.५ अब्ज डॉलर्सच्या डिफेन्स बजेटला आधीच मंजूरी दिली आहे.