US Military Bases Destroyed and Iran attack update shows Pentagon moving soldiers to temporary locations like hotels : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या काही आठवड्यांपासून संघर्ष सुरू आहे. यादरम्यान इराणने केलेल्या हल्ल्यांमुळे प्रदेशातील अमेरिकेच्या लष्करी तळांचे मोठे नुकसान झाले असून अमेरिकन सैन्याकडून वापरले जाणारे १३ पैकी अनेक लष्करी तळ हे राहण्यायोग्य राहिलेले नाहीत. यामुळे युद्धादरम्यान पेंटागॉनला आपल्या सैनिकांना हॉटेल, कार्यालये आणि इतर तात्पुरत्या ठिकाणी हलवावे लागले आहे.

लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याने अमेरिकन लष्कराच्या लढण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. महत्त्वाच्या तळांवर झालेले हल्ले, कमांड सेंटर्सचे झालेले नुकसान आणि पायाभूत सुविधा विस्कळीत झाल्याने हजारो अमेरिकन सैनिकांना युद्धातील मोहिमांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधांमधून बाहेर काढून तात्पुरत्या ठिकाणी हलवावे लागले आहे, अशी माहिती लष्करी कर्मचारी आणि अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

यामुळे जमिनीवरील अमेरिकन सैन्य हे आता ‘रिमोटली’ काम करत युद्ध लढत आहे. इतकेच नाही तर, फायटर पायलट आणि एअरक्राफ्ट क्रू हे देखील त्यांच्या इराणविरोधातील हवाई मोहिमी आणि लढाऊ विमानांच्या देखभालीचे काम अशाच ठिकाणांहून करत आहेत.

हा बदल केल्यामुळे पेंटागॉनला आपली मोहिम सुरू ठेवणे शक्य झाले असले तरी, विद्यमान आणि माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या मते अमेरिकन लष्कराला याची ऑपरेशनल किंमत मोजावी लागत आहे.

“हो, आमच्याकडे तात्पुरत्या स्वरूपाचे ऑपरेशन सेंटर्स उभारण्याची क्षमता आहे, पण यामुळे तुम्ही नक्कीच काही क्षमता गमावता,” असे अमेरिकन हवाई दलातील निवृत्त स्पेशल ऑपरेशन्स टार्गेटिंग स्पेशालिस्ट मास्टर सार्जंट वेस जे. ब्रायंट म्हणाले. “उदाहरणच द्यायचे झाल्यास, तुम्ही तुमची सर्व उपकरणे एखाद्या हॉटेलच्या छतावर ठेवू शकत नाही. त्यातील काही हाताळण्यासाठी अवजड असतात,” असेही ते पुढे म्हणाले. दरम्यान एका अमेरिकन लष्करी अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे की, अमेरिकन सैन्य नागरी हॉटेलच्या छतावरून काम करत नाहीये.

युद्ध सुरू झाले तेव्हा या प्रदेशात जवळपास ४० हजार अमेरिकन सैनिक तैनात होते. तेव्हापासून, सेंट्र्ल कमांडने हजोरो सैनिकांनी इतर ठिकाणी पाठवले असून, काहींना तर थेट युरोपपर्यंत हलवण्यात आले आहे, अशी माहिती अमेरिकन लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर इतर अनेक सैनिक अजूनही मध्यपूर्वेतच आहेत, परंतु ते आता त्यांच्या मूळ तळांवर नाहीत, असेही सांगितले जात आहे.