US Military Aircraft Missing Persian Gulf: अमेरिकी लष्करी विमानांना गॅस पुरवठा करणारे विमान कतारच्या हद्दीत बेपत्ता झाले आहे. बोईंग केसी-१३५ स्ट्रॅटोटँकर हे विमान पर्शियन गल्फमध्ये उड्डाण करत होते दरम्यान, त्याच्याशी संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील अल थापरा या विमानतळावरुन विमानाने उड्डाण केले. इराण हद्दीच्या जवळच पर्शियन गल्फमध्ये असताना विमानाशी संपर्क तुटला, अशी माहिती समोर आली आहे.

इमर्जन्सी संदेश

अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष पेटल्यापासून बोईंग केसी-१३५ स्ट्रॅटोटँकर हे गॅस पुरवठा करणारे विमान मध्य पूर्वेत तैनात करण्यात आले आहे. समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, विमान हवेत असताना गोलाकार पद्धतीने उड्डाण करत होते. दरम्यान, लँडिगवेळी विमानातून इमर्जन्सी संदेश देण्यात आला. या इमर्जन्सीचा अर्थ सध्या अमेरिकेच्या गुप्त संस्थांंच्या माध्यमातून लावला जात आहे. या घटनेमागे काही अनुचित प्रकार आहे का? असाही संशय सध्या व्यक्त केला जात आहे.

इराणने झटकले हात

इराणच्या फार्स न्यूज या वृत्तसंस्थेने अमेरिकी विमान बेपत्ता झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तात फार्स न्यूजने फ्लाईट रडार २४ या संकेतळावरील माहितीचा आधार घेतला आहे. दरम्यान, या घटनेमागे इराणचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेकडून देखील याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

काय आहे बोईंग केसी-१३५ स्ट्रॅटोटँकर?

अमेरिकेचे बोईंग केसी-१३५ स्ट्रॅटोटँकर हे लष्करी विमान असून, हवेत दुसऱ्या विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी याचा वापर केला जातो. या विमानात चार टर्बोफॅन इंजिन आहेत. इंधन भरणा प्रणालीच्या वरती कार्गोडेकची जागा असून, याच्या माध्यमातून प्रवासी आणि साहित्य वाहतूक करता येण्याची सोय आहे. गेल्या ६० वर्षांपासून ही विमानं अमेरिकी लष्कराचा भाग आहेत. इंधन भरणा करण्याशिवाय या विमानाचा प्रवासी वाहतुकीसाठी आणि साहित्या वाहून नेण्यासाठी देखील वापर केला जातो.