Details of the High-Risk US Iran Rescue Operation : इराणच्या लष्कराने अमेरिकेचे F-15E स्ट्राईक ईगल हे लढाऊ विमान पाडल्यानंतर विमानातील वैमानिकाला वाचवण्यासाठी अमेरिकेने एक अत्यंत धाडसी बचाव मोहीम राबवली. मात्र, ही मोहीम अमेरिकेला चांगलीच महागात पडल्याचे पाहायला मिळाले. कारण आपल्या वैमानिकांना वाचवताना अमेरिकेला किमान एक किंवा दोन प्रगत विमाने गमवावी लागली आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वैमानिकाला वाचवण्यासाठी राबवण्यात आलेल्या बचाव मोहिमेदरम्यान अमेरिकन लष्कराने एक तात्पुरत्या धावपट्टीवर अनेक स्पेशल ऑपरेशन ट्रान्सपोर्ट विमाने तैनात केली होती. पण येथील परिस्थिती अचानक गुंतगुंतीची झाली, कारण लँडिंग केल्यानंतर यापैकी किमान एक किंवा दोन विमाने तांत्रिक बिघाड किंवा ते वाळवंटातील जमिनीत रूतून बसल्याने निकामी झाली. त्यानंतर इराणी लष्कराचा धोका पाहाता, अमेरिकेने ही बचाव मोहिम पूर्ण करण्यासाठी दुसरी विमाने इराणमध्ये पाठवली. दरम्यान एका प्रादेशिक गुप्तचर अधिकाऱ्याने असोसिएटेड प्रेसला माहिती दिली की, या गोंधळामुळे मागे सोडून यावी लागलेली दोन ट्रान्सपोर्ट विमाने अमेरिकन सैन्याने उडवून दिली.

इराणच्या सरकारी माध्यमांनी इस्फाहान प्रांतातील वाळवंटात पडलेल्या या अमेरिकन ‘फिक्स्ड-विंग ट्रान्सपोर्ट’ विमानाच्या उरलेल्या अवशेषांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. रिपोर्टनुसार, हे विमान लॉकहीड मार्टिन सी-१३० प्रकारातील एमसी-१३०जे कमांडो II व्हेरिएंट असल्याचे दिसून येत आहे, ज्याची किंमत १०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे. या विमानांचा वापर बऱ्याचदा स्पेशल ऑपरेशनसाठी शत्रूच्या प्रदेशात सैन्य घेऊन जाण्यासाठी किंवा सैन्य तिथून बाहेर काढण्यासाठी केला जातो.

या अवशेषांमध्ये एका प्रकारच्या रोटरक्राफ्टचे अवशेष देखील आढळून आले, जे की बोईंग एमएच-६ लिटल ब्रर्ड विमान असावे , असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फ्लाईट ग्लोबल रिपोर्टनुसर, हे बोईंग एमएच-६ लिटल बर्ड हे एमसी-१३०जे च्या मधून सोडले जाऊ शकते आणि याचा वापर हेलिकॉप्टरच्या फ्लाईट रेंजच्या बाहेर असलेल्या विशेष मोहिमांसाठी केला जातो.

“शत्रूचे फ्लाइंग ऑब्जेक्ट्स नष्ट करण्यात आले आणि अमेरिकेला पुन्हा एकदा अपमानास्पद पराभवाचा सामना करावा लागला,” असे इराणी रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) म्हटले आहे.

इराणच्या जॉइंट मिलिटरी कमांडने नंतर स्पष्ट केले की, “अध्यक्ष ट्रम्प यांच्यावरील नामुष्की टाळण्यासाठी अमेरिकेने स्वत:च्याच विमानावर बॉम्ब टाकले.”

अमेरिकेने आपलीच विमाने का उद्ध्वस्त केली?

इराणी सैन्याचा धोका लक्षात घेऊन अमेरिकन सैन्याला आपलीच विमाने उडवून देण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली. संवेदनशील उपकरणे इराणी सैन्याच्या हाती लागण्याचा धोका टाळण्यासाठी हे करण्यात आले. शत्रूच्या प्रदेशात हाय-रिस्क मोहिम राबवत असताना हा एक स्टँडर्ड प्रोटोकॉल असतो. ओसामा बिन लादेनला ठार करण्यासाठी राबवलेल्या मोहिमेवेळी अमेरिकन लष्कराने अ‍ॅबोटाबादमध्येही हाच प्रोटोकॉल पाळला होता.

या विमाने प्रगत कम्युनिकेशन, नेव्हिगेशन आणि स्पेशल ऑपरेशन्स सिस्टम्स अशा क्लासिफाईड तंत्रज्ञानाने सुसज्ज होती, आणि हे तंत्रज्ञान सुरक्षित ठेवण्यासाठी, तसेच ते शत्रूच्या हाती लागू नये म्हणून त्याच्या किमतीचा विचार मागे सोडून ही विमाने बॉम्बने उडवून देण्यात आली.

इराणमध्ये अडकलेल्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याला अमेरिकेने कसे वाचवले?

इराणने अमेरिकेचे लढाऊ विमान एफ-१५ इ पाडल्यानंतर त्यातील वैमानिकाला अमेरिकन हवाई दलाने काही वेळातच इराणमधून सुखरूप उचलून बाहेर नेले. परंतु, त्या विमानातील वेपन सिस्टिम अधिकारी मात्र इराणमध्ये अडकला. डोंगराळ भागात विमान पडले होते. त्यामुळे अधिकाऱ्याने डोंगरातील एका गुफेत आश्रय घेतला. अमेरिकेची गुप्तहेर संस्था सीआयएने अधिकाऱ्याचे लोकेशन माहिती करून घेतले. त्यानंतर अमेरिकेन लष्कराकडून अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली.

अधिकारी ज्या ठिकाणी अडकला त्या भागात इराणी लष्कर येऊ नये म्हणून अमेरिकन हवाई दलाने सर्वात आधी बॉम्बवर्षाव केला. त्यानंतर अधिकाऱ्याला सुखरूप ताब्यात घेतले. दरम्यान, ज्या विमानांमधून कमांडो इराणमध्ये आले होते, त्यापैकी दोन विमाने इराणच्या दुर्गम भागात अडकली. त्यामुळे कमांडोंना नेण्यासाठी तीन विमाने इराणमध्ये पाठवण्यात आली. त्या तीन विमानातून कमांडो वेपन सिस्टिम अधिकाऱ्याला घेऊन बाहेर पडले. इराणमध्ये अडकलेली दोन विमाने इराणी लष्कराच्या हाती लागू नये म्हणून उद्ध्वस्त करण्यात आली.