US attacks Iran latest updates following Donald Trump warning: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध समाप्तीचा करारासंबंधीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असतानाच पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिल्यानंतर अमेरिकन लष्कराने इराणवर हल्ला चढवला. अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडने सलग दुसऱ्या दिवशी इराणमधील अनेक लक्ष्यांवर स्व-संरक्षणात्मक हल्ले केल्याचे सांगितले.

इराणच्या स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, दक्षिण भागांमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली होती. पश्चिम तेहरान, फार्स प्रांत, बंदर अब्बास, केशम बेट, किश, मीनाब आणि मध्य इस्फहानमधील काही भागांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले.

अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. तसनीम वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने माहिती दिली की, हवाई दल आणि नौदलाने अमेरिकी सैन्यावर दोन टप्प्यांत हल्ला केला आहे. या हल्ल्यांमध्ये अमेरिकन सैन्य तैनात असलेल्या तळांवरील १८ प्रमुख आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले.

us attack on iran
अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडने हल्ल्याची माहिती दिली.

होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद

जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी महत्त्वाचा जल मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी या संघर्षानिमित्त पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. आयआरजीसीने एका निवेदनात म्हटले की, होर्मुझची सामुद्रधुनी सर्व जहाजांसाठी बंद करण्यात आली आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, इराणमधील किनारी प्रदेशात असुरक्षितता निर्माण झाल्यामुळे तेल टँकर आणि व्यापारी जहाजांसह सर्व जहाजांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ बंद करण्यात येत आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

व्हाईट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलत असताना ट्रम्प म्हणाले, “आम्ही कालही त्यांच्यावर जोरदार हल्ला केला आणि आजही आम्ही पुन्हा एकदा तीव्र हल्ले करू. त्यांना तणाव टाळायचा असेल तर लवकर करार करावा.”

ट्रम्प यावेळी असेही म्हणाले की, इराणच्या हद्दीतील लक्ष्यांवर मारा करण्यासाठी ४९ टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. यापैकी काही लक्ष्ये इराणची राजधानी तेहरानपासून केवळ ६४ किमी अंतरावर होती. अमेरिकेची लढाऊ विमाने इराणच्या हवाई हद्दीत कार्यरत आहेत. इराणचा नैऋत्य भाग, पर्शियन आखातात असलेल्या रडार यंत्रणा आणि हवाई संरक्षण यंत्रणा निकामी केली जात आहे.

संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनीही यांनीही इराणला इशारा दिला होता. सेंटकॉम आज रात्री व्यस्त असणार आहे, असे म्हणत अमेरिका मोठ्या लष्करी कारवाईची तयारी करत असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. “अमेरिका आज रात्री इराणवर जोरदार हल्ला करेल. हे हल्ले इराणमधील प्रमुख ठिकाणांना लक्ष्य करतील”, असे हेगसेथ म्हणाले होते.

इराणचाही इशारा

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या आयआरजीसी एअरोस्पेस फोर्सचे कमांडर, ब्रिगेडियर जनरल माजिद मोसवी यांनी इशारा दिला की, जर होर्मझुची सामुद्रधुनी अस्थिर झाली तर संपूर्ण इराणमधून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल. “जर तुम्ही पवित्र होर्मुध सामुद्रधुनीला असुरक्षित करत असाल तर तुमच्यासाठी हा संपूर्ण प्रदेश आम्ही नरकासमान करू”, असा इशारा माजिद मोसवी यांनी दिला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधल्याचा दावा खोटा असून असे कोणतेही संभाषण झाले नसल्याचे वृत्त इराणी माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

इराणकडून कुवेत, बहारीनच्या अमेरिकी तळांवर हल्ला

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) दिलेल्या माहितीनुसार, इराणने केलेल्या कारवाईत कुवेतमधील अली अल-सलेम आणि अहमद अल-जाबेर हवाई तळ आणि बहारीनमधील शेख ईसा हवाई तळाला लक्ष्य केले. इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटले की, बंदर अब्बासजवळील भागांसह दक्षिण इराणमधील झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले.

दरम्यान इराणच्या हल्ल्यानंतर कुवेतच्या नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाने खबरदारीचा उपाय म्हणून आपली हवाई हद्द तात्पुरती बंद केल्याची घोषणा केली.

US Apache Helicopter Crash
अमेरिकेचे अपाचे हेलिकॉप्टर पडले की इराणने पाडले?

शस्त्रसंधीनंतरही हल्ले सुरूच

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यात युद्ध सुरू झाले. त्यानंतर अनेकवेळा दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीचा करार करत त्याला मुदतवाढ देण्यात आली. मात्र शस्त्रसंधी असतानाही अमेरिका आणि इराण एकमेकांवर कुरघोडी केली जात होती. तीन महिन्यांपासून युद्धसमाप्तीसाठी सुरू असलेली वाटाघाटी यशस्वी झालेली नाही. ताज्या संघर्षामुळे युद्धातून लगेच काही तोडगा निघेल, असे चिन्ह दिसत नाही.

या आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिकेचे अपाचे हे लढाऊ हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केल्यानंतर अमेरिकन लष्कराने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इराणी हवाई संरक्षण आणि रडार सुविधांना लक्ष्य केले. इराणनेही याचे प्रत्युत्तर देण्यासाठी जॉर्डन, कुवेत आणि बहारीनमधील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले.