एपी, बगदाद

इराकमधील अमेरिकी फौजा माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा अमेरिकी लष्कराने बुधवारी केली. उत्तर इराकमधील इर्बिल येथील शेवटच्या हवाई तळावरून अमेरिकी सैन्य माघारी परतले. ‘इस्लामिक स्टेट’ या दहशतवादी गटाविरोधात पुकारलेली मोहीम १२ वर्षांनी अधिकृतरीत्या संपुष्टात आली. दरम्यान, अमेरिकेची ही माघार म्हणजे पराभव असल्याची प्रतिक्रिया इराण आणि इराकमधून देण्यात आली आणि तेथे जल्लोष करण्यात आला.

अमेरिका-इराण युद्धादरम्यान अमेरिकेने इराकमधून फौजा माघारी घेण्याची घोषणा केली. अमेरिका-इराण युद्धादरम्यान इराकलाही लक्ष्य करण्यात आले होते. इस्लामिक प्रतिकाराचा हा विजय असल्याची भावना इराक आणि इराणमध्ये व्यक्त झाली. या प्रदेशातून अमेरिकेला पूर्ण बाहेर काढण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडल्याची प्रतिक्रिया इराणने व्यक्त केली. अमेरिकेच्या माघारीच्या या कार्यक्रमाला इराकचे पंतप्रधान अली अल झैदी उपस्थित होते. एका नव्या टप्प्याला सुरुवात झाल्याचे ते म्हणाले.

अमेरिकेने २००३ मध्ये सद्दाम हुसेन सरकारला पाडण्यासाठी इराकवर आक्रमण केले. अमेरिका २०११ मध्ये माघारी गेली. मात्र, तीन वर्षांनंतर ‘इस्लामिक स्टेट’च्या फोफावलेल्या दहशतवादी जाळ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेला पुन्हा या भागात यावे लागले. ‘आयएस’ला नेस्तनाबूत करण्यात पुरेसे यश आल्यानंतर, २०२४ मध्ये अमेरिका आणि इराकने ही मोहीम संपुष्टात आणायचे ठरवले. या मोहिमेला बुधवारी अधिकृत विराम मिळाला.