Strait of Hormuz : अमेरिका-इराणमधील युद्ध संपवण्याबाबत कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाही. त्यामुळे युद्धाचा वणवा पुन्हा पेटणार की युद्धविराम कायम राहणार? याबाबतचा अद्याप संभ्रम कायम आहे. सध्या अमेरिका आणि इराणमध्ये पाकिस्तानच्या माध्यमातून शांतता चर्चेची दुसरी फेरी सुरू आहे. पण दुसऱ्या फेरीत देखील युद्धाबाबत ठोस तोडगा निघेल का? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

यातच काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीत नाकाबंदी करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे इराण आणि अमेरिकेच्या तणावात आणखी भर पडली होती. अद्यापही होर्मुझ सामुद्रधुनीत तणावाची परिस्थिती आहे आणि याचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. कारण होर्मुझ सामुद्रधुनीमधून होणाऱ्या जागतिक व्यापाराला अडथळे निर्माण होत आहेत.

या सर्व घडामोडींच्या अनुषंगाने अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदीची घोषणा केल्यापासून आतापर्यंत किती जहाजांवर कारवाई केली? याबाबत आता मोठी माहिती आता समोर आली आहे. अमेरिकेने गेल्या २० दिवसांत होर्मुझमधील ४८ जहाजे वळवली आहेत. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

अमेरिकेने किती जहाजांवर कारवाई केली?

इराणच्या सागरी मालमत्तेवरील निर्बंधांशी संबंधित अंमलबजावणीच्या कारवाईचा भाग म्हणून अमेरिकेने गेल्या २० दिवसांत पर्शियन आखातातील विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून ४८ जहाजे वळवली आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) शनिवारी एक्सवरील एका पोस्टमध्ये दिली आहे.

दरम्यान, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नाकेबंदीच्या काळात तैनातीचा भाग म्हणून अमेरिकेचं यूएसएस न्यू ऑरलियन्स (LPD-१८) हे जहाज अरबी समुद्रात कार्यरत आहे. या नाकेबंदीदरम्यान अमेरिकेचं यूएसएस न्यू ऑरलियन्स हे जहाज समुद्रात प्रवास करत आहे. गेल्या २० दिवसांत नाकेबंदीचे पालन सुनिश्चित करण्यासाठी ४८ जहाजे वळवण्यात आली असल्याची माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिली आहे.

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा भडकणार?

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण अमेरिका करारांप्रति वचनबद्ध नसल्याचा दावा इराणने केला आहे. तसेच इराणच्या लष्करी अधिकाऱ्यानेही एक मोठं वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. मोहम्मद जाफर असदी हे इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) मधील एक इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि ब्रिगेडियर जनरल आहेत. त्यांनी म्हटलं की, ‘अमेरिका-इस्रायल युद्ध पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. कारण समोर आलेले पुरावे हेच दर्शवतात की अमेरिका कोणत्याही करारांप्रति किंवा संधींप्रति वचनबद्ध नाही’, असा दावा त्यांनी केला आहे.

मोहम्मद जाफर असदी यांनी इराणच्या फार्स न्यूज एजन्सीने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात हे भाष्य केलं. असदी यांनी आरोप केला की, “अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या अलीकडील कृती आणि विधानांचा अभ्यास केला तर राजनैतिक सामंजस्याप्रती वचनबद्धतेचा अभाव दिसून येत आहे. कारण अमेरिकी अधिकाऱ्यांच्या कृती आणि विधानं प्रामुख्याने प्रसिद्धीसाठी प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. त्यांचा पहिला उद्देश तेलाच्या किंमती कमी होण्यापासून रोखणं आणि दुसरं म्हणजे त्यांनी निर्माण केलेल्या गोंधळातून स्वतःची सुटका करून घेणं हाच असल्याचं दिसत आहे. पण इराणचं सशस्त्र दल सतर्क आहे. कारण कोणत्याही प्रकारच्या वाढत्या तणावाला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणचं सशस्त्र दल सज्ज आहे”, असं मोहम्मद जाफर असदी यांनी म्हटलं आहे.