US Navy strikes Indian sailors killed : MT Settebello या पलाऊचा ध्वज असलेल्या टँकरवर अमेरिकन नौदलाने ओमानच्या आखातात केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला आहे, याबद्दल अमेरिकेने माफी मागण्यास नकार दिला आहे. या जहाजाने नाकेबंदीचे उल्लंघन करून इराणी तेलाची वाहतूक करण्याचा प्रयत्न केला आणि जहाजावरील कर्मचाऱ्यांनी वारंवार दिलेल्या आदेशांचे पालन केले नाही, असे सांगत अमेरिकेने या कारवाईचे समर्थन केले आहे. यासंदर्भात अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्य उपप्रवक्ते टॉमी पीगॉट यांनी निवेदन सादर केले आहे.
नागरी जहाजांवर केलेल्या या प्राणघातक कारवाईवर नवी दिल्लीने तीव्र आक्षेप घेतला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी थेट चर्चा करून औपचारिक निषेध नोंदवला आणि असे हल्ले कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाहीत, असे स्पष्ट केले.
मात्र, टॉमी पिगॉट म्हणाले, “अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी काल भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. दोन्ही अधिकाऱ्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अलीकडील घडामोडींवर चर्चा केली. परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी यावर भर दिला की, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये शांतता आणि सुरक्षा राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकन सैन्याने दिलेल्या आदेशांचे सर्व व्यावसायिक जहाजांनी त्वरित पालन केले पाहिजे. अमेरिकेच्या नाकेबंदीचे उल्लंघन आणि इराणी तेलाची बेकायदेशीर वाहतूक खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.”
एस. जयशंकर काय म्हणाले होते?
एस. जयशंकर यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांच्याशी संध्याकाळी चर्चा केली आहे. अमेरिकन नौदलाने आखातात केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय नाविकांचा मृत्यू झाल्याबद्दल पुन्हा एकदा निषेध व्यक्त केला आहे. व्यावसायिक जहाजांवर अशा प्रकारची प्राणघातक कृत्ये अन्यायकारक आहेत”, असे जयशंकर यांनी म्हटले आहे.
Spoke to US Secretary of State Marco Rubio this evening. I reiterated India’s strong protest at the attacks by the US Navy in the Gulf that killed three Indian mariners. Such lethal actions against commercial shipping are not justified.— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) June 12, 2026
लक्ष्य करण्यात आलेल्या MT Settebello या जहाजावर २४ कर्मचारी होते, ज्यामध्ये आदित्य शर्मा, शिवानंद चौरासिया आणि पटनाला सुरेश या तीन मृत भारतीय खलाशांचा समावेश आहे. ओमानच्या अधिकाऱ्यांनी उर्वरित २१ कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. भारतीय कर्मचारी असलेल्या ‘MT Jalveer’ सारख्या इतर जहाजांच्या बाबतीतही या भागात अशाच घटना घडल्या आहेत, ज्यावर भारतीय दूतावास बारीक लक्ष ठेवून आहे.
