एपी, न्यूयॉर्क : अमेरिकेच्या विधी विभागाने शुक्रवारी एप्स्टाइन फाइलच्या आणखी लाखो कागदपत्रे प्रसिद्ध केली. अल्पवयीन मुली आणि तरुणींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून तुरुंगात गेलेला आणि तुरुंगातच मरण पावलेला अमेरिकी अब्जाधीश व्यावसायिक जेफ्री एप्स्टाइनच्या गुन्ह्यांचा तपास करताना हाती लागलेल्या नोंदी प्रसिद्ध केल्या जात आहेत. यासाठी १९ डिसेंबरची मुदत देण्यात आली होती, मात्र ती पाळली गेली नव्हती.
जेफ्री एप्स्टाइनच्या गुन्ह्यांचा तपास करताना सरकारला मिळालेली माहिती ‘एप्स्टाइन फाइल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट’अंतर्गत प्रसिद्ध केली जात आहे. ही कागदपत्रे प्रसिद्ध करावीत यासाठी राजकीय आणि नागरिकांचा दबाव वाढल्यानंतर हा कायदा करण्यात आला. या नोंदींमध्ये एप्स्टाइनच्या श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तींशी असलेल्या संबंधांचाही समावेश आहे. यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या फाइलमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उद्योजक बिल गेट्स, विचारवंत नोआम चोम्स्की यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिकांच्या प्रतिमा होत्या.
डेप्युटी ॲटर्नी जनरल टॉड ब्लांच यांनी सांगितले की, विधी विभाग एप्स्टाइन फाइलची ३० लाखांपेक्षा जास्त पाने प्रसिद्ध करत आहे. या फाइल विभागाच्या संकेतस्थळावर पोस्ट करण्यात आल्या आहेत. डिसेंबरमध्ये यापैकी काही नोंदी रोखून धरल्या होत्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत ५२ लाख कागदपत्रे प्रसिद्ध करण्यात आली असून त्यांचे पुनरावलोकन केले जात आहे.

