US F-15 Pilot Rescue Operation In Iran: इराणने अमेरिकेचे लढाऊ विमान एफ-१५ पाडल्यानंतर त्याच्या पायलटला अमेरिकी सैनिकांच्या विशेष तुकडीने सुरक्षितपणे वाचवले असल्याची माहिती समोर आली आहे. विमानावर हल्ला झाल्यानंतर पायलटने पॅराशूटच्या मदतीने बाहेर उडी घेतली. यानंतर अमेरिकेने बचाव मोहीम सुरु करुन पायलटला सुरक्षित मायदेशी परत आणले, अशी माहिती खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

पायलटने घेतली उडी

ॲक्सिऑसच्या वृत्तानुसार, पायलटने विमानातून उडी घेताना तीन शब्दांचा एका संदेश अमेरिकी यंत्रणांना पाठवला होता. पण, हा संदेश इराणच्या कटाचा भाग असू शकतो, अशी शंका निर्माण झाली होती. इराण कदाचित अमेरिकी सैनिकांचा घात करण्याचा डाव रचत असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला. पायलटने विमानातून उडी घेताना “गॉड इज ग्रेट” असा संदेश पाठवला होता. पण, या संदेशामुळे अमेरिकी यंत्रणांनी शंका उपस्थित केली होती.

तीन शब्दांचा संदेश

पायलटने पाठवलेल्या रेडिओ संदेशावरुन अमेरिकेत गैरसमज निर्माण झाला. “गॉड इज ग्रेट” असा पाठवलेला संदेश “पॉवर बी टू गॉड” असा समजला गेला. यामुळे हा संदेश अमेरिकीच्या सैनिकांना जाळ्यात ओढण्याचा इराणचा एखादा प्लॅन असू शकतो अशी शंका व्यक्त करण्यात आली. दरम्यान, अधिकच्या पडताळणीनंतर हा संदेश “गॉड इज ग्रेट” असा असून, पायलट जिवंत असल्याचे समजले. यानंतर बचाव मोहीम सुरु करण्यात आली, असे ॲक्सिऑसच्या वृत्तात म्हटले आहे.

अमेरिकेची धाडसी मोहीम

गंभीर जखमी झालेला पाय़लट डोंगर भागात २४ तासांपेक्षा अधिककाळ जिंवत होता. इराणी सैनिक आणि स्थानिक त्याचा शोध घेत होते. त्यामुळे त्याच्या जिवाला धोका होता. पण, पायलटला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिकेच्या २०० विशेष तुकडीच्या सैनिकांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. समोर आलेल्या वृत्तांनुसार इराणने पायलटला पकडण्यासाठी बक्षीस देखील जाहीर केले होते. अमेरिकेने आधुनिक यंत्रणांच्या मदतीने पायलटच्या शोध घेऊन त्याला सुखरुप माघारी आणले.

ट्रम्प यांचा गंभीर इशारा

“या कारवाईदरम्यान इस्रायलने मर्यादित स्वरुपात मदत केली,” असे डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲक्सिऑसशी बोलताना सांगितले. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मंगळवारपर्यंत मुदत दिली आहे. इराणने तडजोड न केल्यास सर्व बेचिराख करण्याचा गंभीर इशारा त्यांनी ॲक्सिऑसशी बोलताना दिला आहे. इराणने देखील जशास तसे उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. इराण – अमेरिकेत शांतता चर्चा घडवून आणण्यासाठी पाकिस्तान, इजिप्त, तुर्किये मध्यस्थी करत आहे.