US Pilot Rescue Operation Iran : अमेरिका-इराण युद्ध अद्यापही सुरू आहे. या युद्धाला तब्बल एक महिना उलटला आहे. मात्र, अजूनही या युद्धाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. अमेरिका-इराण युद्ध कधी थांबणार? की हे युद्ध आणखी भडकणार? याबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. एकीकडे युद्धविरामाच्या चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दररोज इराणला धमकी देत आहेत.
यातच इराणने अमेरिकेचे दोन लढाऊ विमाने पाडल्याची माहिती समोर आली आहे. इराणने एकाच दिवसात अमेरिकेची दोन लष्करी विमाने F-१५ आणि A-१० पाडल्याचा आणि दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे अमेरिकेला धक्का बसला आहे. इराणने अमेरिकेचे दोन लढाऊ विमाने पाडल्याच्या या घटनेत अमेरिकन पायलटही बेपत्ता आहे. या बेपत्ता पायलटचा शोध सुरू आहे. अमेरिकेसह इराणदेखील त्याचा शोध घेत आहे.
दरम्यान, या बेपत्ता पायलटच्या आईने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये ती आपल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत असल्याचं दिसून आलं. त्या अमेरिकी महिलेच्या भावनिक पोस्टवर इराणने आता प्रतिक्रिया दिली. ‘तुमचा मुलगा ट्रम्प यांच्यापेक्षा आमच्याकडे जास्त सुरक्षित आहे’, असं एका पोस्टमध्ये इराणने म्हटलं आहे.
इराणच्या दूतावासाने काय म्हटलं?
“तुमच्या मुलाला इराणी कैदेपेक्षा जास्त धोका अमेरिकेत ट्रम्प यांच्यासोबत राहण्यात आहे. त्यामुळे तुम्ही प्रार्थना करा की तो अमेरिकेच्या बचाव पथकाला सापडू नये. तो इराणी कैदेतच राहो. कारण मुस्लिम आणि सुसंस्कृत इराणी लोकांना ताब्यात असलेल्या कैद्यांशी कसं वागावं हे माहिती आहे”, असं इराणी दूतावासाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Be sure your sons are more in danger with DJ Trump than in custody in Iran.
— Embassy of IR Iran Pakistan (@IraninIslamabad) April 4, 2026
Pray he's kept captive by Iran than found by US rescue teams!
As Muslim and civilised Iranians, We know how to treat captives in custody with dignity and respect. https://t.co/On6aVF7l6C pic.twitter.com/9mRsq08MUt
अमेरिकी महिलेने काय म्हटलं होतं?
इराणने पाडलेल्या विमानांच्या पायलटसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन एका अमेरिकी महिलेने सोशल मीडियावर केलं होतं. त्या पोस्टमध्ये तिने म्हटलं की, “माझा एक मुलगा लढाऊ पायलट आहे आणि मला अजून त्याच्याकडून किंवा त्याच्या युनिटकडून काहीही माहिती कळलेली नाही. त्यामुळे मला चिंता वाटत आहे. कृपया सर्व वैमानिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना करा”, असं अमेरिकन महिलेने म्हटलं होतं.
इराणने अमेरिकेची विमाने कशी पाडली?
अमेरिकेची विमाने कशी पाडली, हे इराणने अद्याप उघड केलेले नाही. तरी विश्लेषकांच्या मते, हे माजिद इन्फ्रारेड हवाई संरक्षण प्रणाली किंवा खांद्यावरून डागता येणारी क्षेपणास्त्रे वापरून विमानांना लक्ष्य केले असावे. ज्यांचा शोध घेणे कठीण असते. १९ मार्च रोजी अमेरिकेचे सर्वात प्रगत स्टेल्थ लढाऊ विमान असलेल्या एफ-३५ वर हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या माजिद प्रणालीचाच हात असल्याचे मानले जाते.
