Donald Trump On US Israel Iran War : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. अमेरिका-इस्रायलने संयुक्तपणे लष्करी कारवाई करत इराणवर हल्ले केले. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणने अमेरिका आणि इस्रायलवर जोरदार प्रतिहल्ले केले. एवढंच नाही तर काही आखाती देशांवरही इराणने हल्ले केले. त्यामुळे हे युद्ध आणखी भडकण्याची चिन्ह निर्माण झाले आहेत.
या युद्धाचे परिणाम जगातील अनेक देशांवर आता होत असून जगातील तेलाचा व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, असं असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे संकेत दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सांगितलं की इराणला लक्ष्य करण्यासाठी आता प्रत्यक्षात काहीही शिल्लक नाही आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापार व्यत्ययांमुळे कच्चे तेल आणि वायूच्या वाढत्या किमतींच्या चिंतेमुळे हे युद्ध लवकरच संपवू शकतं असे संकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत.
या युद्धाबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘इराणला टार्गेट करण्यासाठी आता जवळजवळ काहीही शिल्लक नाही’, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲक्सिओसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध लवकरच संपणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलं?
अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, “इराणशी सुरु असलेलं युद्ध लवकरच संपेल. कारण आता इराणमध्ये लक्ष्य करण्यासाठी व्यावहारिकदृष्ट्या काहीही शिल्लक नाही. थोडं फार काही शिल्लक असेल. त्यामुळे मी जेव्हा हे युद्ध संपवू इच्छितो तेव्हा ते संपेल”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
?????President Trump told me in a phone interview Wednesday that the war with Iran will end "soon" because there is "practically nothing left" to target. "Little this and that… Any time I want it to end, it will end," Trump said. My story on @axios https://t.co/Z9iL47VRq2
— Barak Ravid (@BarakRavid) March 11, 2026
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे संकेत दिले आहेत की अमेरिका-इस्रायलने केलेल्या कारवाईत त्यांचं उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात साध्य झालं आहे. त्यामुळे हे युद्ध लवकरच संपवू शकतं. मात्र, इस्रायली संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी बुधवारी म्हटलं की, हे युद्ध कोणत्याही वेळेच्या मर्यादेशिवाय आणि आवश्यकतेनुसार जोपर्यंत आमचं सर्व उद्दिष्टे साध्य करत नाही आणि ही मोहीम निर्णायकपणे जिंकत नाही तोपर्यंत हे युद्ध चालू राहील.”
