विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाची दखल सातासमुद्रापार बसलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली आहे. मंगळवारी ट्रम्प यांनी निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशासाठी मोदींचे अभिनंदन केले आहे.

देशभरातील पाच राज्यांमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. तर गोवा आणि मणिपूरमध्ये छोट्या पक्षांच्या मदतीने भाजपने सरकार स्थापन केले आहे. यातील उत्तरप्रदेशमधील भाजपचा विजय हा ऐतिहासिक मानला जात आहे. भाजपच्या या विजयाची दखल अमेरिकेनेही घेतली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना फोन करुन त्यांचे अभिनंदन केले. ‘डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या अँजेला मर्केला यांना फोन करुन त्यांच्या पक्षांना स्थानिक निवडणुकीत मिळालेल्या यशासाठी अभिनंदन केले’ अशी माहिती व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी दिली.

मोदी आणि ट्रम्प यांच्यात यापूर्वीही फोनवर चर्चा झाली होती. जानेवारीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. अमेरिकेसाठी भारत हाच खरा मित्र असून जागतिक पातळीवरही विविध मुद्द्यांवर दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतील असे ट्रम्प यांनी म्हटले होते. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांचे अभिनंदन करणा-या पहिल्या पाच नेत्यांमध्ये मोदींचा समावेश होता. निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही ट्रम्प यांनी भारताशी संबंध सुधारण्यावर भर देऊ असे म्हटले होते. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी यापूर्वी मोदींच्या कार्यशैलीचेही कौतुक केले होते.  जानेवारीमध्ये झालेल्या चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना अमेरिका भेटीचे आमंत्रण दिले. तर मोदींनीही ट्रम्प यांना भारत दौ-यासाठी आमंत्रित केले होते. आता या दोन्ही नेत्यांची प्रत्यक्ष भेट कधी होणार याची उत्सुकता आहे.