Donald Trump On US Indea Trade Deal : भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या व्यापार कराराची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराबाबत बुधवारी महत्त्वाचे विधान केले आहे. भारतासोबत नुकताच झालेला करार हा ‘ऐतिहासिक व्यापार करार’ असल्याचे ट्रम्प म्हणाले आहेत. तसेच या करारामुळे अमेरिकेच्या कोळसा निर्यातीत मोठी वाढ होईल, असेही त्यांनी सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

माध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले की, “अमेरिका हा सध्या ऊर्जा उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आहे… आपण एक प्रचंड मोठे ऊर्जा निर्यातदार बनत आहोत. गेल्या काही महिन्यांमध्येच आपण जपान, कोरिया, भारत आणि इतर देशांबरोबर आपली कोळसा निर्यात मोठ्या प्रमाणा वाढवण्यासाठी ऐतिहासिक व्यापार करार केले आहेत…आपल्या कोळशाची गुणवत्ता जगात सर्वत्र सर्वोत्तम मानली जाते.”

वर्षभरापासून वाटाघाटी…

भारत आणि अमेरिका यांच्यातील नुकत्याच पूर्ण झालेल्या व्यापार करारचा पुढील दिशा काय असेल याबाबत माहिती प्रसिद्ध केल्यानंतर ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. जवळपास एक वर्ष वाटाघाटी चालल्यानंतर दोन्ही देशांमध्ये अंतरिम व्यापार करारावर सहमती झाली आहे. दोन्ही देशांमधील याबाबतच्या वाटाघाटींना फेब्रुवारी २०२५ मध्ये सुरूवात झाली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून झालेल्या चर्चेनंतर या कराराची घोषणा करण्यात आली आहे. या फोनवरील संभाषणात दोन्ही नेत्यांनी अंतरिम कराराचा आराखडा निश्चित केला. या करारानुसार अमेरिका भारतातील विविध मालांवर आकारले जाणारे टॅरिफ ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणणार आहे. याचा थेट फायदा भारताला होणार आहे.

यामध्ये कापड आणि गारमेंट्स, लेदर आणि पादत्राणे, प्लास्टिक आणि रबरच्या वस्तू, ऑरगॅनिक रसायने, होम डिकोर प्रॉडक्ट्स, हस्तकलेच्या वस्तू आणि यंत्रांच्या काही निवडक श्रेणींचा समावेश आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही महिन्यांत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. ट्रम्प प्रशासनाने भारताकडून होणाऱ्या आयातीवर ५० टक्के टॅरिफ लादल्यानंतर या वाटाघाटी थांबल्या होत्या. यापैकी २५ टक्के टॅरिफ हे ऑगस्टमध्ये लागू करण्यात आले होते. भारत रशियाकडून खरेदी करत असलेल्या कच्च्या तेलाच्या माध्यमातून युक्रेनमधील रशियाच्या युद्धाला बळ मिळत असल्याचे कारण सांगत अमेरिकेने हे टॅरिफ लादले होते.