Donald Trump Iran Claim Regarding Supreme Leader Post: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या चमत्कारिक विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. आज बोललेल्या विधानाच्या अगदी उलट ते दुसऱ्या दिवशी भूमिका घेऊ शकतात. टॅरिफबाबत त्यांच्या भूमिकांमुळे संपूर्ण जगाची डोकेदुखी झाली होती. आता इराण युद्धादरम्यानही ते स्वतःच निरनिराळे दावे करत असतात. कधी ते युद्ध थांबवतात, तर कधी जोरदार हल्ला करणार असल्याचे सांगतात. आता तर त्यांनी एक अजब दावा केला आहे. इराणने त्यांच्याकडे युद्धबंदीची याचना करताना थेट सर्वोच्च नेतेपद देऊ केले, असे ट्रम्प म्हणाले आहेत.

महिन्याभरापासून सुरू असलेल्या युद्धावर अखेर तोडगा काढण्यासाठी इराणबरोबर चर्चा सुरू आहे, असा दावा ट्रम्प यांनी नुकताच केला होता. मात्र इराणने वाटाघाटीची चर्चा फेटाळून लावली.

अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाच्या निधी संकलन कार्यक्रमात बोलत असताना ट्रम्प यांनी म्हटले, “इराणच्या नेतृत्वाने युद्ध संपविण्यासाठी चर्चा सुरू केली. तसेच इराणच्या इस्लामिक राजवटीचे पुढचे सर्वोच्च नेतेपद मी स्वीकारावे, असे अनौपचारिक प्रस्ताव मांडला होता. परंतु मी तो फेटाळून लावला.”

एनआरसीसीच्या स्नेहभोजन कार्यक्रमात ट्रम्प यांनी इराण युद्धाची माहिती दिली. ते म्हणाले, आपण इराणवर मोठा विजय मिळवला आहे. याआधी एवढा मोठा विजय कुणीही मिळवला नव्हता. इराण आता युद्ध थांबवून सामंजस्याने चर्चा करू पाहत असला तरी तो घाबरलेला आहे. कोणत्याही देशाचा नेता आता इराणचा प्रमुख बनण्याच्या परिस्थितीत नाही. त्यांनी मला अनौपचारिक चर्चेत सर्वोच्च पद देऊ केले. पण मी साफ नकार दिला.

इराणमधील अनेक नेते मारले गेल्यानंतर दावा

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी हे इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात २८ फेब्रुवारी रोजी मारले गेल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ अनेक लष्करी अधिकारी ठार झाले आहेत. इराणमध्ये सत्ता सांभाळण्यासाठी नेता उरला नसल्याची चर्चा असताना ट्रम्प यांचे हे विधान समोर आले आहे.

अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनीला सर्वोच्च नेतेपदी बसविण्यात आले. मात्र त्यानंतर मोजतबा खामेनी यांचा सार्वजनिक वावर दिसलेला नाही. काही माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार मोजतबा खामेनी इस्रायलच्या हल्ल्यात जबर जखमी झाले होते.

इराणचा लष्करी संहार

इराणविरोधात सुरू असलेल्या लष्करी कारवाईचे वर्ण करताना ट्रम्प यांनी याला लष्करी संहार असे नाव दिले. त्यांनी या युद्धात अमेरिकेचा विजय झाला असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, इराणबरोबर युद्ध समाप्तीची गुप्त चर्चा सुरू असून तिथली राजवट युद्धविरामासाठी उत्सुक आहे. मात्र देशाअंतर्गत विरोधामुळे त्यांना याच्या परिणामांची भीती वाटते.

‘..किंवा आपण त्यांना ठार मारू’

डोनाल्ड ट्रम्प या कार्यक्रमात बोलताना पुढे म्हणाले, “आपण इराण विरोधातील युद्ध मोठ्या फरकाने जिंकत आहोत. मध्यपूर्वेत इतका मोठा विजय कुणीही पाहिला नव्हता. आता ते वाटाघाटी करण्यास इच्छुक आहेत. पण त्यांना जाहीर तसे बोलता येत नाही. त्यांना भीती वाटते की, त्यांचेच लोक त्यांना ठार करतील. तसेच त्यांना ही भीतीसुद्धा आहे की, आपण त्यांना ठार मारू.”