US-Japan Trade Deal: भारताशी दीर्घकाळ रखडलेला व्यापार करार पूर्ण केल्यानंतर आता अमेरिका आणि जपान यांच्यातील व्यापार करारही झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराची माहिती दिली. दोन्ही देशांनी कराराची माहिती दिली आहे. ट्रुथ या सोशल मीडिया साईटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले, “जपानशी आमचा व्यापार करार झाला असून येत्या काळात जपानकडून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाणार आहे. यातील पहिला टप्पा लवकरच पूर्ण होईल.”
पहिल्या टप्प्यात जपान ३६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. यात अमेरिकेतील टेक्सासमध्ये तेल निर्यात सुविधा उभारणे, जॉर्जियामध्ये दुर्मिळ खनिज प्रकल्प आणि ओहिओमध्ये नैसर्गिक वायू प्रकल्प उभारला जाणार आहे. ५५० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा हा पहिला टप्पा असेल.
जपानवर किती टॅरिफ लादणार?
भारत आणि अमेरिकेत काही दिवसांपूर्वी व्यापार करार झाला. यामध्ये भारताने अमेरिकेला ५०० अब्ज डॉलर्सची उत्पादने खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे. तर भारतीय वस्तूंवरील टॅरिफ कमी करून १८ टक्क्यांवर आणला गेला आहे. तर अमेरिकेच्या वस्तूंवर भारतात शून्य टक्के टॅरिफ लादला जाणार आहे.
मात्र जपानी वस्तूंवर केवळ १५ टक्के टॅरिफ लावला जाणार असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या व्यापार कराराला ऐतिहासिक करार असे म्हटले आहे. “या कराराद्वारे अमेरिकेतील औद्योगिक क्षेत्राला पुन्हा एकदा नवी संजीवनी मिळेल. तसेच या प्रकल्पातून अमेरिकेतच लाखो रोजगार उपलब्ध होतील. आमच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची सुरक्षा पहिल्यापेक्षा आणखी बळकट होणार आहे”, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.
टॅरिफ शिवाय हे शक्य नव्हते
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुढे म्हणाले, टेक्सासमध्ये तेल आणि वायू, ओहियोमध्ये ऊर्जा आणि जॉर्जियामध्ये दुर्मिळ खनिज प्रकल्पाची घोषणा करताना मला आनंद होत आहे. हे प्रकल्प खूप मोठे आहेत आणि टॅरिफ या एका शब्दामुळे हे सर्व शक्य झाले आहे.

