वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘नेटो’ देशांच्या विश्वासार्हतेवरच गुरुवारी शंका घेतली. अमेरिकेवर हल्ला झाला, तर अमेरिकेच्या बचावासाठी हे देश येतील का, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. तसेच, ‘नेटो’ संघटनेतील सदस्य देशांनी संरक्षणासाठीचा अपेक्षित खर्च न केल्यास अमेरिका सदस्यदेशांच्या पाठीशी राहणार नाही, अशी रोखठोक भूमिका ट्रम्प यांनी मांडली. येत्या काळात ‘नेटो’ संघटनाही डळमळीत होते का, अशी शक्यता त्यामुळे व्यक्त केली जात आहे.

तत्कालीन सोव्हिएत रशियाबरोबर अमेरिकेचे शीतयुद्ध सुरू होते, तेव्हा ‘नेटो’ संघटनेची स्थापना झाली होती. ‘नेटो’वर ट्रम्प दीर्घकाळापासून टीका करीत आहेत. अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेग्सेट यांनी गेल्या महिन्यात युक्रेन ‘नेटो’मध्ये नसल्याने तिथे अमेरिका शांतिसेना पाठविणार नसल्याची भूमिका घेऊन ‘नेटो’ सदस्य देशांना धक्का दिला होता. तसेच, ‘नेटो’ देशावर हल्ला झाला, तर त्याच्या संरक्षणासाठीही येणार नसल्याचे अमेरिकेने सांगितले.

ट्रम्प म्हणाले, ‘नेटो’ चांगली संघटना आहे. तुम्हाला तेथून काही तरी चांगले मिळायला हवे. त्यांच्या लष्करासाठी १०० टक्के निधी आम्ही देतो आणि व्यापारामध्ये ते आम्हाला त्रास देतात. ‘नेटो’ सदस्य देशांनी संरक्षणावरील खर्चाचे लक्ष्य गाठले नाही, तर अमेरिकाही मित्रदेशाचा धर्म पाळण्यास कटिबद्ध राहणार नाही, असे ट्रम्प म्हणाले.

त्यांनी संरक्षणावर अपेक्षित खर्च केला नाही, तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार नाही.’

अमेरिकेवर वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ल्यानंतर ‘नाटो’ देश अमेरिकेच्या बाजूने उतरले होते. मात्र, तरीही ट्रम्प यांनी शंका घेतली आहे.

‘नेटो’बद्दल सर्वांत मोठी समस्या मला जाणवते, ती म्हणजे जेव्हा अमेरिका संकटात असेल आणि आम्ही त्यांना बोलावले, तर ते आमच्या संरक्षणासाठी येतील? त्यांनी तसे यायला हवे. पण, मला त्याची खात्री वाटत नाही.

डोनाल्ड ट्रम्पअध्यक्ष, अमेरिका