Moodys US Rating : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. या निर्णयांमध्ये बेकादेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्यांना हद्दपार करण्यासह जगातील अनेक देशांवर टॅरिफ (आयातशुल्क) लागू करण्याचा निर्णयांचा समावेश आहे. खरं तर आयातशुल्क लागू करण्याच्या निर्णयानंतर अनेक देशात त्याचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर अनेक देशांनी या संदर्भात नाराजी देखील व्यक्त केली. त्यानंतर अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचा निर्णय तात्पुरता स्थगित केला.
दरम्यान, जगभरात अद्यापही टॅरिफबाबत मोठी चर्चा सुरू आहे. असं असतानाच आता अमेरिकेबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जगातील अव्वल संस्थांपैकी एक असलेल्या पतमापन संस्था ‘मूडीज’ने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का दिला आहे. मूडीजने अमेरिकेचे क्रेडिट रेटिंग शुक्रवारी एका अंकाने कमी केल्याची माहिती समोर आली आहे. या मागचं कारण वाढतं कर्ज आणि व्याज देयकासंदर्भातील कारण देत अमेरिकेचं क्रेडिट रेटिंग एका अंकाने कमी करण्यात आल्याचं ‘मूडीज’ने सांगितलं आहे.
मूडीजने अमेरिकेचे क्रेडिट रेटिंग एका अंकाने कमी केल्यामुळे आता हे स्पष्ट होताना दिसत आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा फटका अमेरिकेला कशा प्रकारे बसत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम अमेरिकेच्या आर्थिक परिस्थितीवर होत असल्याचं यावरून स्पष्ट होतं. दरम्यान, मूडीजने अमेरिकेचे क्रेडिट रेटिंग “Aaa” वरून ‘Aa1’ पर्यंत कमी केलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, मूडीजने अमेरिकेचे क्रेडिट रेटिंग कमी केल्यानंतर आता अमेरिका सर्वोच्च श्रेणीत राहिली नाही. मूडीजने अमेरिकेचे क्रेडिट रेटिंग कमी केलं असून अशा प्रकारे क्रेडिट रेटिंग कमी करणारी ती पहिली संस्था नाही. अशा प्रकारे याआधी दोन वेळा दोन संस्थांनी रेटिंग कमी केलं होतं. यापूर्वी यापूर्वी स्टँडर्ड अँड पूअरने (S&P) २०११ मध्ये रेटिंग कमी केलं होतं. तसेच फिच रेटिंग्जने (Fitch Ratings) २०२३ मध्ये रेटिंग कमी केलं होतं.
मूडीजवर व्हाईट हाऊसची प्रतिक्रिया काय?
मूडीजच्या क्रेडिट रेटिंग कमी करण्याच्या निर्णयावर व्हाईट हाऊसकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. एका सोशल मीडिया पोस्टंमध्ये व्हाईट हाऊसचे कम्युनिकेशन्स डायरेक्टर स्टीव्हन च्यूंग यांनी मूडीजचे अर्थशास्त्रज्ञ मार्क झांडी यांच्यावर टीका केली आहे. तसेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध राजकीय पक्षपाती असल्याचा आरोप केला आहे आणि या विश्लेषणांमध्ये विश्वासार्हता नसल्याचं म्हणत त्याचं मूल्यांकन गांभीर्याने घेतले जात नाही. कारण ते वारंवार चुकीचं सिद्ध झालं आहे, असं स्टीव्हन च्यूंग यांनी म्हटलं आहे.