अण्वस्त्र व क्षेपणास्त्र चाचण्यांनी अमेरिका, जपान या देशांना धमकी देणाऱ्या उत्तर कोरियाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला. अमेरिकेला धोका निर्माण झाला किंवा अमेरिकेत भीतीचे वातावरण निर्माण झाल्यास उत्तर कोरियाला नष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संबोधित केले. उत्तर कोरिया आणि दहशतवाद यावर त्यांनी भाष्य केले. संयुक्त राष्ट्रातील पहिल्याच भाषणात ट्रम्प यांनी आक्रमकपणे उत्तर कोरियाबाबत भूमिका मांडली. अमेरिकेकडे संयम आणि ताकद दोन्ही आहे. पण अमेरिका किंवा त्यांच्या मित्र राष्ट्रांवर संकट आल्यास आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील असे सूचक विधान त्यांनी केले. संयुक्त राष्ट्र तसेच अन्य देशांनी उत्तर कोरियावर दबाव आणावा अन्यथा आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल असे ट्रम्प म्हणालेत.

‘रॉकेट मॅन’ (किम जाँग उन) सध्या आत्मघातकी मोहीमेवर आहे. तो स्वतःला आणि स्वतःच्या साम्राज्याला अडचणीत आणत आहे. मात्र अमेरिकेला धोका निर्माण झाला तर उत्तर कोरियाला नष्ट करण्याशिवाय पर्याय नाही असा इशाराच ट्रम्प यांनी दिला.

दहशतावादाला पाठिंबा देणाऱ्या देशांनाही ट्रम्प यांनी सुनावले. दहशतवादासाठी जबाबदार असलेल्या देशांनी दहशतवादी आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले पाहिजे. इस्लामी दहशतवाद आम्ही थांबवणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. अमेरिकेला सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. पण आम्ही याचा गैरफायदा घेऊ देणार नाही किंवा हे एकतर्फी होऊ शकत नाही. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून मी सर्वप्रथम अमेरिकेतील नागरिकांच्या हिताचे रक्षण करणार असे त्यांनी सांगितले.

उत्तर कोरिया आता लष्करी बळात अमेरिकेची बरोबरी करण्याच्या जवळ येऊन ठेपला आहे असे उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उनने म्हटले होते. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांनी जागतिक शांततेला धोका निर्माण झाला आहे.