अमेरिका आणि इराण युद्धाला तीन महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे. पण तरी देखील अमेरिका आणि इराणमधील या युद्धाबाबत कोणताही ठोस तोडगा काढण्यात यश आलेलं नाही. सध्या दोन्ही देशात युद्धविराम आहे. पण असं असतानाही दोन्ही देशातील तणाव कमी झालेला नाही. अद्यापही मध्यपूर्वेत युद्धाचे ढग अधिक गडद आहेत.

अमेरिका -इराण युद्धाचे परिणाम अनेक देशांवर होत आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीमधून होणाऱ्या जागतिक व्यापाराला देखील अडथळे निर्माण होत असल्याने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे अमेरिका-इराणमधील हे युद्ध नेमकं कधी संपणार? याकडे अवघ्या जगाच लक्ष लागलेलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये शांतता कराराच्या चर्चा सुरू आहेत. पण काही अटी-शर्थींमुळे हा शांतता करार होऊ शकलेला नाही. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या शांतता कराराबाबत पुन्हा एकदा भाष्य करत इराणला मोठा इशारा दिला आहे.

‘इराणबरोबर शांतता करार होईपर्यंत इराणला कोणतीही सवलत दिली जाणार नाही, किंवा तोपर्यंत कोणतेही निर्बंध हटवले जाणार नाहीत’, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे इराणसमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. इराणच्या जप्त केलेल्या मालमत्तांबाबत आणि इराणवर लादलेल्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी हे भाष्य केलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

“जोपर्यंत तेहरानबरोबर करार होत नाही, तोपर्यंत अमेरिका इराणची गोठवलेली मालमत्ता सोडणार नाही”, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी सूचित केलं की, तणावाच्या पार्श्वभूमीवर वाटाघाटी सुरू असताना निर्बंधांमधील कोणतीही शिथिलता इराणने कराराच्या अटींचं पालन करण्यावर अवलंबून असेल.

“भविष्यात होणाऱ्या करारानुसार इराणने आपली वचनबद्धता पूर्ण केल्यानंतरच निर्बंधांमध्ये कोणतीही सूट दिली जाईल. पण करार झाल्यानंतरच. जर ते योग्य रीतीने वागले आणि त्यांनी चांगलं काम केलं, तर आम्ही पुन्हा वाटाघाटी सुरू करू”, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे.

लेबनॉनबद्दल ट्रम्प काय म्हणाले?

“आम्ही तेहरानबरोबरच्या कोणत्याही अल्पकालीन करारामध्ये लेबनॉनचा समावेश करण्यासाठी आग्रह धरत नाही आहोत. मला वाटतं की त्यांना तसं झालेलं बघायला आवडेल. पण मी तशी मागणी करत नाही. पश्चिम आशियातील अनेक महिन्यांच्या संघर्षावर आणि वाढलेल्या तणावावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू आहेत. ट्रम्प प्रशासन संभाव्य शांतता करारासाठी आग्रही आहे”, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

Donald Trump warns Iran

इराणने कराराला अद्याप सहमती का दिली नाही? ट्रम्प यांनी सांगितलं कारण

“अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर इराणचे नेते ज्या परिस्थितीत सापडले आहेत, ती स्वीकारण्यासाठी ते धडपडत आहेत. ते सामर्थ्यवान आहेत, ते स्वाभिमानी आहेत. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या त्यांना कराव्या लागतील असा कधी त्यांनी विचारही केला नसेल. मात्र, आता त्यांना त्या कराव्या लागणार आहेत. कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. कदाचित याला आणखी थोडा वेळ लागेल”, असंही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एप्रिलमध्ये अमेरिका आणि इराण अशा दोन्ही बाजूंनी युद्धविरामावर सहमती दर्शवली होती. त्यानंतर युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आणि पुढे त्याचा कालावधी देखील वाढण्यात आला होता. सध्या युद्धविराम असला तरी दोन्ही देशांकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ काही ठिकाणी हल्ले केले जात असल्याने हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Donald Trump warns Iran
इस्रायल हेरगिरी करत असल्याचा संशय अमेरिकेला असून अमेरिकी अधिकारी इस्रायल दौऱ्यावर असताना बर्नर फोन वापरत असल्याची माहिती समोर आली.

डोनाल्ड ट्रम्प यांचा नेतान्याहूंवर अविश्वास? इस्रायल हेरगिरी करत असल्याचा संशय?

डोनाल्ड ट्रम्प आणि बिन्यामिन नेतान्याहू यांच्यातील मतभेद आणखी वाढल्याची शक्यता आहे. कारण इस्रायल हेरगिरी करत असल्याचा अमेरिकेला संशय असल्याचं वृत्त समोर आलं आहे. इस्रायलच्या दौऱ्यादरम्यान अमेरिकी अधिकारी बर्नर फोन वापरत आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या पेंटागॉनला इस्रायलकडून अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हेरगिरीची भीती वाटतेय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

एका वृत्तानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून अमेरिका अधिक काळजी घेत आहे. तसेच इस्रायलच्या दौऱ्यादरम्यान अमेरिकेचे अधिकारी बर्नर फोन, तात्पुरतं संगणक आणि विशेषतः उच्चस्तरीय भेटींच्या दरम्यान अधिक काळजी घेत आहे. माजी राजनैतिक अधिकारी, गुप्तचर अधिकारी आणि सुरक्षा तज्ञांनी याबाबत सांगितलं की, वरिष्ठ अमेरिकी अधिकारी इस्रायलमध्ये असताना हॉटेलच्या खोल्यांमध्ये आणि इतर संभाव्य असुरक्षित ठिकाणी संवेदनशील विषयांवर चर्चा करणं देखील टाळत आहेत.

“अमेरिका इस्रायलला भेट देताना आधीच अतिरिक्त खबरदारी घेत आहे”, असं एका विद्यमान अधिकाऱ्याने सांगितल्याचं वृत्तात म्हटलं. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि बिन्यामिन नेतान्याहू यांच्यातील मतभेद वाढत आहेत का? डोनाल्ड ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यात बिनसलं आहे का? अमेरिका इस्रायलवर अविश्वास का दाखवत आहे? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.