Donald Trump and Asim Munir discussion on Iran Israel conflict : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे आर्मी चीफ फील्ड मार्शल असीम मुनीर यांची व्हाईट हाऊस येथे दुपारच्या जेवणाच्या वेळी भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी सध्या सुरू असलेल्या इराण-इस्त्रायल संघर्षाच्या मुद्यावर सविस्तर चर्चा केली. गुरूवारी पाकिस्तानी लष्कराने एक निवेदन जारी करत याबद्दल माहिती दिली आहे. “इराण आणि इस्रायल यांच्यातील सध्याच्या तणावाच्या परिस्थितीवर देखील सविस्तर विचारांची देवाणघेवाण झाली, यावेळी दोन्ही नेत्यांनी हा संघर्ष थांबवण्याच्या महत्त्वावर भर दिला.”
मुनीर यांच्याबरोबर इराणबाबत चर्चा करण्यात आली का? याबद्दल विचारले असता ट्रम्प म्हणाले की, “खरंतर ते इराणला बहुतेकांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे ओळखतात आणि ते या कोणत्याही गोष्टीबद्दल खूष नाहीत.” डोनाल्ड ट्रम्प पुढे बोलताना म्हणाले की, “असे नाही की त्यांचे इस्त्रायलबरोबर वाईट संबंध आहेत. ते दोघांना चांगले ओळखतात, पण कदाचित ते इराणला जरा अधिक चांगलं ओळखतात, पण त्यांना काय सुरू आहे याची कल्पना आहे, आणि ते (असीम मुनीर) माझ्याशी सहमत आहेत.”
या भेटीनंतर पाकिस्तानी लष्कराने इस्लामाबाद येथे सांगितले की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दीर्घकालीन धोरणात्मक हितसंबंधांच्या आधारे दोन्ही देशांना फायदेशीर ठरतील असे व्यापारी संबंध पाकिस्तानबरोबर विकसीत करण्यात रस दाखवला.
मुनीर यांची भेट घेण्याचे कारण काय?
दिल्लीच्या आकलनानुसार, अमेरिका रावळपिंडीचा पाठिंबा मिळवत आहे याचे कारण हे आगामी काळात इराणवर कोणत्याही प्रकारचा लष्करी हल्ला करण्यासाठी त्यांना पाकिस्तानचे हवाई क्षेत्र, हवाई तळ आणि इतर पायाभूत सुविधा यांचा वापर करायचा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी मुनीर यांच्याबरोबर दुपारचे जेवण घेण्यामागे हाच मुख्य हेतू होता. विशेष म्हणजे, या दोन नेत्यांमधील लंच हा एक तासासाठी नियोजित होता तो जवळपास दोन तास चालला. द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या अॅना केली यांनी सांगितलं की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अणुयुद्ध रोखल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचविल्यानंतर ट्रम्प हे मुनीर यांचे आतिथ्य करत होते.
पण सुत्रांनी सांगितले की, ही बैठक नियमित राजनैतिक मार्गांनी आयोजित करण्यात आलेली नव्हती, आणि यासाठी सल्लागार, उद्योजक आणि इतर प्रभावशाली व्यक्तींकडून नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारचे प्रयत्न करण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिक मजबूत दहशतवाद-विरोधी सहकार्य, क्रिप्टो-लिंक्ड इन्फ्लुअन्स नेटवर्क्सशी संबंध, आणि वॉशिंग्टन येथील रिपब्लिकन-संलग्न फर्मीच्या मदतीने करण्यात आलेले टार्गेटेड लॉबिंग याद्वारे पाकिस्तानला ट्रम्प यांच्याबरोबरची ही बैठक करणे शक्य झाले.
अमेरिका पाकिस्तान यांच्या संबंधांचा गेल्या काही दशकांपासून मागोवा घेत आलेल्या सूत्राने सांगितले की, “जेवणाच्या वेळी बैठक तर सोडाच, एखाद्या लष्करी प्रमुखाला एका पोटस (अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष) यांनी बैठकीसाठी आमंत्रित करणे दुर्मिळच नाही तर पूर्णपणे आधी कधीही घडले नाही अशी गोष्ट आहे.”
याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी २००४ मध्ये पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांची भेट घेतली होती. मुनीर यांचा अमेरिका दौरा गेल्या रविवारी सुरू झाला आणि २०२२ मध्ये लष्कर प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा हा दुसरा दौरा होता.
ट्रम्प यांनी मुनीर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांबद्दलही उत्साह दाखवला आहे. त्यांनी मुनीर यांना भेटणं सन्मानजनक असल्याचे म्हटले आहे, तसेच त्यांच्यात इराण-इस्त्रायल संघर्षाच्या स्थितीबद्दल चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. “मी त्यांना इथे आणण्याचे कारण म्हणजे, युद्धात न पडल्याबद्दल आणि युद्ध संपवल्याबद्दल (भारताबरोबर) मी त्यांचे आभार मानू इच्छितो. आणि तुम्हाला माहिती आहेच, मी पंतप्रधान मोदी यांचेही आभार मानू इच्छितो,” असे ट्रम्प म्हणाले.
“आम्ही भारताबरोबर एका व्यापारी करारावर काम करत आहोत. आम्ही पाकिस्तानबरोबरही एका व्यापारी करारावर काम करत आहोत,” असेही ट्रम्प यावेळी म्हणाले.
दरम्यान मुनीर-ट्रम्प भेटीच्या वेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबियो आणि मध्य पूर्वेसाठीचे अमेरिकेचे विशेषे प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ हे देखील उपस्थित होते. तर पाकिस्तानकडून पाकिस्तान नॅशनल सेक्युरिटी अॅडव्हायजर आणि आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक हे उपस्थित होते.
या भेटीपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी फोन कॉलवरून ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविराम हा दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये झालेल्या चर्चेनंतर झाला. यामध्ये अमेरिकेची कसलीही मध्यस्थी नव्हती हे स्पष्ट केले.
ट्रम्प मुनीर यांच्या भेटीनंतर पाकिस्तानी लष्कराने एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे पाकिस्तान सरकार आणि नागरिकांच्या वतीने कौतुक करण्यात आले आहे.