US President Donald Trump on Cuba power: व्हेनेझुएलामध्ये लष्करी सत्तांतर आणि इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कॅरिबियनमधील क्युबाबाबत मोठे विधान केले आहे. सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी क्युबावर ताबा मिळवण्याची शक्यता व्यक्त केली.

“सध्या ते खूप कमजोर”

ट्रम्प म्हणाले, “मला खात्री आहे की मला क्युबा ताब्यात घेण्याचा सन्मान मिळेल. कोणत्यातरी स्वरूपात क्युबा ताब्यात घेणे हा मोठा सन्मान असेल. मी त्याला मुक्त करू शकतो किंवा ताब्यात घेऊ शकतो. खरं सांगायचं तर, मी त्याच्यासोबत मला हवं ते काहीही करू शकतो. सध्या ते खूप कमजोर राष्ट्र आहे.”

क्युबा अंधारात!

अमेरिकेच्या नेतृत्वाखालील तेल नाकेबंदीनंतर क्युबामध्ये वीजपुरवठा कोलमडल्याने संपूर्ण बेट अंधारात बुडाले असताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले. वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या इंधनाच्या तीव्र तुटवड्यामुळे सुमारे ९६ लाख लोकसंख्या असलेल्या या कॅरिबियन बेटावर वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.

दरम्यान, क्युबाचे अध्यक्ष मिगेल डियाझ-कॅनेल यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे देशाला गेल्या तीन महिन्यांपासून आवश्यक इंधनाचा पुरवठा मिळालेला नाही. त्यामुळे ऊर्जा संकट अधिक तीव्र झाले आहे.

क्युबावर आर्थिक दबाव वाढवण्याचा प्रयत्न

ट्रम्प प्रशासन क्युबामध्ये राजकीय बदल घडवून आणण्यासाठी आर्थिक दबाव वाढवत असल्याचेही समोर आले आहे. जवळपास ६७ वर्षांपासून सुरू असलेल्या एकपक्षीय राजवटीत बदल घडवण्यासाठी क्युबाला अमेरिकेवर आर्थिकदृष्ट्या अधिक अवलंबून ठेवण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे.

क्युबाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका

‘द न्यूयॉर्क टाईम्स’च्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासन क्युबाच्या राष्ट्राध्यक्षांना सत्तेवरून हटवण्याच्या पर्यायांचाही विचार करत आहे. या संकटाची सुरुवात ३ जानेवारी रोजी अमेरिकेने क्युबाचा प्रमुख मित्रदेश असलेल्या व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना पदावरून हटवल्यानंतर झाली. त्यानंतर तेलबंदीमुळे क्युबाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.

‘असाधारण धोक्याला’ उत्तर

दरम्यान, ट्रम्प यांनी इंधनबंदीचे समर्थन करताना म्हटले की, क्युबामुळे अमेरिकेला निर्माण झालेल्या ‘असाधारण धोक्याला’ उत्तर म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. तसेच त्यांनी संकेत दिले की, इराणविरुद्धचे युद्ध संपल्यानंतर क्युबासोबत एखादा करार होऊ शकतो. “मला वाटते की आपण लवकरच करार करू किंवा मग आपल्याला जे करायचे आहे ते करू,” असे ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले.