Donald Trump On Strait Hormuz : अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. अमेरिका-इस्रायल मिळून इराणवर जोरदार हल्ले करत आहेत, तर इराणही जोरदार प्रतिहल्ले करत आहे. या संघर्षामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला असून जगातील अनेक देशांना होणारा तेल आणि वायूचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीत देखील मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती असल्याने कच्च्या तेलाच्या जहाजांच्या वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाचा व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर असल्यामुळे अनेक देशांत इंधनाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. असं असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
‘होर्मुझची सामुद्रधुनी लवकरच खुली, सुरक्षित आणि मुक्त करू’, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तसेच मित्र राष्ट्रांना युद्धनौका पाठवण्याचं आवाहनही ट्रम्प यांनी केलं आहे. याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक पोस्ट शेअर करत सविस्तर भाष्य केलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, “अनेक देश विशेषतः इराणच्या होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रयत्नामुळे प्रभावित झालेले देश, होर्मुझची सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित ठेवण्यासाठी युद्धनौका पाठवतील आणि अमेरिकेसोबत सामील होतील. आम्ही इराणची लष्करी क्षमता १०० टक्के नष्ट केली आहे. मात्र, त्यांचा कितीही पराभव झाला तरी होर्मुझच्या या जलमार्गात कुठेही एक किंवा दोन ड्रोन पाठवणं, भूसुरुंग टाकणं किंवा क्षेपणास्त्र डागणं हे इराणसाठी सोप्प आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे की चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, ब्रिटन यांच्यासह या कृत्रिम नाकेबंदीमुळे प्रभावित झालेले इतर देशही या भागात त्यांच्या युद्धनौका पाठवतील”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
“अमेरिका होर्मुझची सामुद्रधुनीच्या किनारपट्टीवर बॉम्ब फेक करत राहील आणि इराणी नौका आणि जहाजे पाण्यात बुडवेल. कोणत्याही परिस्थितीत लवकरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली, सुरक्षित आणि मुक्त असेल”, असं मोठं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर कुणाचा ताबा?
होर्मुझ सामुद्रधुनीच्या उत्तरेला इराण आणि दक्षिणेला ओमान व संयुक्त अरब अमिराती हे देश आहेत. ही सामुद्रधुनी उत्तरेकडील पर्शियन आखाताला दक्षिणेकडील ओमानच्या आखाताशी जोडते आणि त्यानंतर ती अरबी समुद्रात विलीन होते. या सामुद्रधुनीची लांबी सुमारे १६१ किलोमीटर आणि रुंदी सर्वात अरुंद भागात फक्त ३३ किलोमीटर आहे. कोणत्याही वेळेस या मार्गावरून डझनभर तेलवाहू जहाजे ये-जा करीत असतात. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय समुद्र कायद्यानुसार, प्रत्येक देशाला त्याच्या किनारपट्टीपासून १२ नॉटिकल मैल (सुमारे १३.८ मैल) पर्यंतचा भाग नियंत्रित करण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ असा की, होर्मुझ सामुद्रधुनीचा सर्वात अरुंद भाग संपूर्णपणे इराण आणि ओमानच्या क्षेत्रामध्ये येतो. त्यामुळे या सामुद्रधुनीवरील नियंत्रण आणि प्रवेशाबाबत इराण आणि ओमान यांच्याकडे मोठे अधिकार आहेत. याच गोष्टीमुळे इराणकडून वेळोवेळी या मार्गावरील वाहतूक थांबवण्याची धमकी दिली जाते. या सामुद्रधुनीअंतर्गत इराण त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या भागात कारवाई करू शकतो.
होर्मुझच्या सामुद्रधुनीचे महत्त्व काय?
होर्मुझ सामुद्रधुनीतून दररोज सुमारे २० ते २१ दशलक्ष बॅरल कच्चे तेल आणि उत्पादनांची वाहतूक केली जाते. अमेरिकेच्या ऊर्जा माहिती प्रशासनाच्या माहितीनुसार, २०२२ मध्ये या मार्गावरून दररोज सरासरी २१ दशलक्ष बॅरल तेल वाहून नेले गेले, जे जगातील एकूण कच्च्या तेलाच्या व्यापाराच्या सुमारे २१ टक्के आहे. OPEC (ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज) सदस्य असलेल्या सौदी अरेबिया, इराण, संयुक्त अरब अमिराती, कुवैत आणि इराक हे देश बहुतांश याच सामुद्रधुनीतून आशियाकडे कच्च्या तेलाची निर्यात करतात. याशिवाय, जगभरात पुरवला जाणारा एकतृतीयांश द्रवित नैसर्गिक वायूचीदेखील याच जलमार्गातून निर्यात होते. म्हणूनच होर्मुझ सामुद्रधुनीला ‘जगाचे तेलवाहतुकीचे हृदय’ असे म्हटले जाते.
