Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्यात ‘बिग ब्युटीफुल बिला’वरून मतभेद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केल्यामुळे ट्रम्प आणि मस्क यांच्यातील मैत्री शत्रुत्वात बदलल्याचं बोललं जात होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेल्या ‘बिग ब्युटीफुल बिला’वरून एलॉन मस्क यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद सुरु झाला. त्यानंतर हा वाद एवढा वाढला की दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले.

पण आता डोनाल्ड ट्रम्प यांनी एलॉन मस्क यांचं कौतुक केल्याचं पाहायला मिळत आहे. एका मुलाखतीत बोलताना ट्रम्प यांनी एलॉन मस्क यांचं कौतुक करताना त्यांना ‘अद्भुत माणूस’ असं संबोधलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी मस्क यांच्याबाबत केलेल्या या कौतुकामुळे त्यांच्यातील मतभेद दूर झाले आहेत का? असा सवाल विचारला जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

एलॉन मस्क यांच्याबाबत बोलताना ट्रम्प यांनी म्हटलं की, “ते नेहमीच चांगलं काम करतील. मला वाटतं की तो एक अद्भुत माणूस आहे. मी त्यांच्याशी जास्त बोललो नाही. परंतु मला वाटतं की एलॉन मस्क हे अतिशय हुशार आहेत. मात्र, मध्यंतरी ते थोडेसे नाराज झाले पण ते योग्य नव्हतं”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ‘बिग ब्युटीफुल बिला’बाबत विचारलं असता ट्रम्प यांनी म्हटलं की, “हे पाहा, इलेक्ट्रिक वाहनांचा आदेश त्यांच्यासाठी कठीण आहे. कारण मला वाटत नाही की प्रत्येकाला इलेक्ट्रिक कार चालविण्यास भाग पाडलं पाहिजे.”

एलॉन मस्क यांनी नुकतीच केली होती टीका

मस्क यांनी नुकतीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटीफुल बिल’वर टीका केली होती. मस्क म्हणाले की, या विधेयकामुळे अमेरिकेतील लाखो नोकऱ्या जातील आणि देशाचे मोठे धोरणात्मक नुकसान होईल. इतकेच नाही, तर मस्क यांनी हे विधेयक पूर्णपणे वेडेपणाचे आणि विध्वंसक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये मस्क यांनी म्हटले की, “सिनेटच्या नवीन विधेयकामुळे लाखो नोकऱ्या जातील आणि यामुळे आपल्या देशाचे धोरणात्मकदृष्ट्या नुकसान होईल. या कायद्यामुळे जुन्या उद्योगांना सवलती मिळतील, परंतु यामुळे भविष्यातील उद्योग नष्ट होतील.” ते पुढे म्हणाले, “हे विधेयक पूर्णपणे वेडेपणा आणि विध्वंसक आहे.”

बिग ब्युटीफुल बिल म्हणजे काय?

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील जनतेला दिलेल्या काही प्रमुख आश्वासनांच्या आधारे दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. यातील काही आश्वासने, जसे की विविध देशांमधून आयातीवर शुल्क लादणे, कार्यकारी आदेशांद्वारे अंमलात आणता येतात. परंतु काही आश्वासने अशी आहेत, ज्यांची पूर्तता करण्यासाठी कायद्यात बदल करणे आवश्यक आहे, जो अमेरिकन काँग्रेसचा (प्रतिनिधी सभागृह आणि सिनेट यांचा समावेश) विशेष अधिकार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा परिस्थितीत ट्रम्प यांना त्यांच्या सर्व निवडणूक आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी काही गोष्टींसाठी काँग्रेसची मान्यता घ्यावी लागेल. हे लक्षात घेता, ट्रम्प यांनी त्यांच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर बदलांचा समावेश करून ‘बिग ब्युटीफुल बिल’ तयार केले आहे. या विधेयकात ट्रम्प यांनी त्यांचा धोरणात्मक अजेंडा आणि प्रचारातील आश्वासने एकत्रितपणे समाविष्ट केली आहेत.