Donald Trump Speech : अमेरिका-इराण युद्धामुळे संपूर्ण पश्चिम आशियात अद्यापही तणाव आहे. या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या व्यापाराला अडथळे निर्माण झालेले आहेत. त्यामुळे याचा फटका जगातील अनेक देशांना बसत असल्यामुळे अमेरिका-इराण युद्ध कधी संपेल? याकडे जगाचं लक्ष लागलं आहे. यातच हे युद्ध लवकरच थांबणार असल्याचं वृत्तही समोर आलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध संपवण्याचे संकेतही दिले. मात्र, ट्रम्प यांच्या दररोजच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे इराणविरोधातील युद्ध नेमकं केव्हा संपणार? या बाबतचा संभ्रम निर्माण झाला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अमेरिकेला संबोधित केलं. यावेळी ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हे युद्ध संपवण्याचे संकेत दिले. पण दुसरीकडे इराणला पुन्हा एकदा धमकीवजा इशारही दिला. इराणबरोबर सुरू असलेलं हे युद्ध कधीपर्यंत चालेल? या युद्धात अमेरिकेचं उद्दिष्ट साध्य झालं का? होर्मुझ सामुद्रधुनी कधी खुली होईल? यासह आदी महत्वाच्या मुद्यांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी भाष्य केलं. या अनुषंगाने ट्रम्प यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे काय आहेत? जाणून घेऊयात.

‘…तर इराणला पुन्हा अश्मयुगात पोहोचवू’, ट्रम्प यांचा इशारा

“अमेरिका पुढील दोन ते तीन आठवड्यांत इराणवर पुन्हा जोरदार हल्ला करेल. इराणने जर कोणताही करार केला नाही, तर अमेरिका इराणला पुन्हा अश्मयुगात पोहोचवेल. मात्र, मुख्य उद्दिष्ट पूर्णत्वाच्या जवळ येत असल्याने हा संघर्ष संपवला जाऊ शकतो”, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला.

‘अमेरिका आपली उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याच्या जवळ’ : ट्रम्प

“अमेरिका इराणविरुद्धची सर्व लष्करी उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याच्या जवळ आहे. अमेरिकी सैन्य आपली मुख्य उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याच्या जवळ असून त्यामध्ये इराणची लष्करी क्षमता नष्ट करणं आणि इराणला अण्वस्त्र मिळवण्यापासून रोखण्यासह आणखी काही मुद्यांचा समावेश आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

…तर पुन्हा हल्ले तीव्र करण्याचा इशारा

“जर इराणने अटी मान्य केल्या नाहीत, तर अमेरिका पुढील दोन ते तीन आठवड्यांत पुन्हा हल्ले तीव्र करण्यास तयार आहे. कारण अमेरिकेची उद्दिष्ट्ये पूर्ण होईपर्यंत लष्करी दबाव कायम ठेवला जाईल”, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

अमेरिकेचं युद्धाबाबतचं उद्दिष्ट्य काय?

“इराणची क्षेपणास्त्र उत्पादन क्षमता नष्ट करणं, इराणचं नौदल कमकुवत करणं आणि तेहरानला अणुशस्त्र मिळू शकणार नाही याची खात्री करणं यासह आदी मुद्यांचा समावेश आहे”, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

इराणची लष्करी क्षमता कमी झाल्याचा दावा

‘इराणचं नौदल आणि हवाई दल मोठ्या प्रमाणात कमकुवत झालं आहे. तसेच इराणच्या नेतृत्वाच्या रचनेलाही मोठं नुकसान झालं आहे’, असा दावा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला.

Donald Trump Speech Top 10 Points

अणु कार्यक्रम हाच मुख्य मुद्दा

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुनरुच्चार करताना म्हटलं की, इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखणं हेच अमेरिकेच्या धोरणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. यावेळी ट्रम्प यांनी ओबामांच्या प्रशासनाच्या काळात झालेल्या वाटाघाटी अणु करारासह पूर्वीच्या राजनैतिक प्रयत्नांवर टीका केली.

अमेरिकेच्या पूर्वीच्या युद्धांशी केली तुलना

ट्रम्प यांनी इराण युद्धाच्या कालावधीची तुलना याआधी झालेल्या युद्धांशी तुलाना केली. पहिल्या महायुद्धात अमेरिकेचा सहभाग एक वर्ष, सात महिने आणि पाच दिवस होता. दुसऱ्या महायुद्धात तीन वर्ष, आठ महिने आणि २५ दिवस अमेरिका सहभागी होती. कोरियन युद्ध तीन वर्ष, एक महिना आणि दोन दिवस चालले. व्हिएतनाम युद्ध १९ वर्ष, पाच महिने आणि २९ दिवस चालले. इराक युद्ध आठ वर्ष, आठ महिने आणि २८ दिवस चालले असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

होर्मुझची सामुद्रधुनी आणि जागतिक तेल पुरवठा

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीवर अवलंबून असलेल्या देशांनी या महत्त्वाच्या सागरी मार्गाच्या सुरक्षेसाठी भूमिका बजावावी’, असं आवाहनही ट्रम्प यांनी केलं. प्रमुख तेल ग्राहक राष्ट्रांनी हा मार्ग कार्यरत राहील याची खात्री करण्याचं आवाहनही ट्रम्प यांनी केलं आहे.

Donald Trump Speech Top 10 Points

मित्र राष्ट्रांचे आभार मानले

ट्रम्प यांनी इस्रायल, सौदी अरेबिया, कतार, कुवेत आणि बहरीन या सारख्या अनेक प्रादेशिक मित्र राष्ट्रांचे आभार मानले आहेत. अमेरिकेच्या लष्करी सहभागाचा उद्देश हा मध्य पूर्वेतील भागीदार राष्ट्रांसाठी स्थिरता आणि सुरक्षा सुनिश्चित करणं हाच आहे, असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

‘इराणवर विश्वास ठेवता येणार नाही’, डोनाल्ड ट्रम्प

“इराणवर अणुशस्त्रांच्या बाबतीत कधीही विश्वास ठेवता येणार नाही. सध्या अमेरिका आपली उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे. अमेरिका आपल्या आखाती मित्र राष्ट्रांना कोणत्याही स्वरूपात हानी पोहोचू देणार नाही”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे.

‘होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेलावर अमेरिका अवलंबून नाही’

“इंधनाच्या दरात झालेली वाढ ही इराणने प्रादेशिक तेलवाहू जहाजांवर केलेल्या हल्ल्यांमुळे झालेली अल्पकालीन वाढ आहे. पण किंमती लवकरच खाली येतील. तसेच अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेलावर अवलंबून नाही आणि भविष्यातही राहणार नाही. या मार्गावर अवलंबून असलेल्या देशांनी थोडं धाडस दाखवून याची काळजी घ्यावी”, असंही ट्रम्प म्हणाले आहेत.

Donald Trump Speech Top 10 Points

१३ अमेरिकन सैनिक ठार

इराण युद्धात अमेरिकेचे अल्पकालीन नुकसान झालं असल्याकडेही ट्रम्प यांनी लक्ष वेधलं. या युद्धात १३ अमेरिकन सैनिक ठार झाले. याकडे अमेरिकन लोकांनी एक गुंतवणूक म्हणून पाहावे, असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

ट्रम्प यांच्या विधानामुळे सभ्रम

ट्रम्प यांच्या कोणत्याही विधानावर कितपत विश्वास ठेवावा, असा प्रश्न निर्माण होतो. २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यापासून ट्रम्प यांनी आजवर वारंवार भूमिका बदलली आहे. कधी ते युद्ध लवकर संपू शकते, असे म्हणतात. तर कधी ते युद्ध आणखी भडकण्याची धमकी देतात. एकीकडे युद्धविरामासाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे मध्यपूर्वेत हजारो अमेरिकन सैनिक तैनात केले जात आहेत.

दरम्यान, ट्रम्प यांच्या भाषणामुळे इराण युद्ध थांबणार की चिघळणार? याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच जर हे युद्ध आणखी भडकलं तर याचा परिणाम निश्चितच भारतावरही होऊ शकतो.