Donald Trump On Colombia : अमेरिकेने व्हेनेझुएलावर हवाई हल्ला करत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यासह त्यांच्या पत्नीला अटक केलं आहे. निकोलस मादुरो यांच्यावर आता अमेरिकेत खटला चालवला जाणार आहे. मात्र, अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या या कारवाईवर जगातील अनेक देशांनी निषेध व्यक्त केला आहे. तसेच व्हेनेझुएला सरकारने या हल्ल्यांला ‘साम्राज्यवादी हल्ला’ असं म्हटलं आहे.

व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॅटिन अमेरिकेतील आणखी एका देशाला थेट लष्करी कारवाईची धमकी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना कोलंबियाच्या सरकार विरुद्ध थेट लष्करी कारवाईची धमकी दिली आणि अशी कारवाई ‘मला चांगली वाटते’, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

“कोलंबिया देखील खूप आजारी आहे. ज्यावर एका आजारी व्यक्तीचं राज्य आहे, ज्याला कोकेन बनवायला आणि ते अमेरिकेला विकायला आवडतं. मात्र, ते तो जास्त काळ करू शकणार नाही”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. यावेळी एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांनी ट्रम्प यांना प्रश्न विचारला की, अमेरिका देशाविरुद्ध (कोलंबिया) लष्करी कारवाई करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “मला ते योग्य वाटतं.”

अमेरिका-व्हेनेझुएलामध्ये वाद काय आहे?

अमेरिका आणि लॅटिन अमेरिकन देश असलेल्या व्हेनेझुएलाचे संबंध गेल्या अनेक वर्षांपासून ताणले गेले आहेत. व्हेनेझुएलामधून अमेरिकेत मोठी ड्रग्ज तस्करी होत असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दुसरीकडे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अमेरिकेचे ड्रग्ज तस्करीचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. या दरम्यान त्यांनी व्हेनेझुएलावर अनेक निर्बंध देखील लादले आहेत. गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाची हवाई हद्द बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर अमेरिकेचे हे पाऊल वसाहतवादी असल्याची टीका व्हेनेझुएलाकडून करण्यात आली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘या’ तीन देशांना इशारा

व्हेनेझुएला या देशावर हल्ला केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी तीन देशांना थेट इशारा दिला आहे. ड्रग्स उत्पादन करणाऱ्यांना आश्रय देणाऱ्या लॅटिन अमेरिकेतील मेक्सिको, क्युबा आणि कोलंबिया या देशांना डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला असून वेनेझुएलानंतर तुमच्या देशांवर हल्ले होऊ शकतात असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.