Donald Trump against Iran’s underground nuclear facility : अमेरिका इराणच्या ‘पिकॅक्स माउंटेन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्यंत सुरक्षित आणि भूमिगत अणु केंद्रावर लवकरच हल्ला करू शकते, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी म्हटलं. तसंच वॉशिंग्टन या ठिकाणावरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असल्याचा इशाराही त्यांनी दिला. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी इराणविरुद्धच्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या अमेरिकेच्या लष्करी मोहिमेचे समर्थन केलं आणि सांगितलं की, तेहरानला अणुशस्त्र विकसित करण्यापासून रोखणं हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. ट्रम्प म्हणाले, “आता आपल्याला पाच महिने झाले आहेत आणि या पाच महिन्यांत आपण काय केलं हे तुम्हाला माहीत आहे का? ते अणुशस्त्र तयार करू शकणार नाहीत, हेच आपण केलं आहे.” त्यांनी इशारा दिला की जर या केंद्रात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळली, तर अमेरिका पिकॅक्स माउंटेनला लक्ष्य करू शकतं.

ट्रम्प यांनी इराणबाबत म्हटलं, “आम्ही पिकॅक्स माउंटेनवर लवकरच हल्ला करू शकतो. पिकॅक्समध्ये हलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आणि इराणमधील प्रत्येक ठिकाणच्या हालचालींची आम्हाला माहिती आहे. जर काहीही चुकीचं घडलं, तर आम्ही त्यांच्यावर हल्ला करू आणि तो हल्ला अत्यंत तीव्र असेल.”

नतांझ जवळील भूमिगत केंद्र

पिकॅक्स माउंटेन हे इराणच्या आधीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या नतांझ युरेनियम समृद्धीकरण केंद्राजवळ स्थित आहे. या ठिकाणी जमिनीखाली अत्यंत खोलवर दोन बोगदे प्रणाली असल्याचं मानलं जातं. या केंद्राच्या भूमिगत रचनेमुळे ते पारंपारिक हवाई हल्ल्यांना मोठ्या प्रमाणात तोंड देण्यास सक्षम आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने यापूर्वी वृत्त दिलं होतं की, इराणने हजारो सेंट्रीफ्यूज या खोलवर बांधलेल्या भूमिगत केंद्रात हलवले असल्याचा इस्रायली गुप्तचर यंत्रणेचा विश्वास आहे. त्यामुळे या ठिकाणावर अमेरिकेने केलेला हल्ला वॉशिंग्टनच्या इराणच्या अणु पायाभूत सुविधांविरुद्धच्या मोहिमेतील एक मोठा संघर्ष वाढवणारा ठरू शकतो.

ट्रम्प यांच्याकडून लष्करी मोहिमेचे समर्थन

ट्रम्प यांनी दावा केला की अमेरिकेच्या लष्करी हस्तक्षेपामुळे प्रादेशिक संघर्ष वाढण्यापासून रोखला गेला आहे. जर वॉशिंग्टनने पाऊल उचलले नसते, तर इराणने इस्रायल, मध्य पूर्व, युरोप आणि अमेरिकेसाठी मोठा धोका निर्माण केला असता, असा युक्तिवाद त्यांनी केला. ट्रम्प म्हणाले, “जर आपण तिथे गेलो नसतो, तर आज इस्रायल अस्तित्वात नसता, मध्य पूर्व नसता. त्यांनी कदाचित पुढे जाऊन युरोपियन शहरे आणि आपल्या शहरांवर हल्ला केला असता.” अमेरिकेच्या मोहिमेमुळेच इराणला अणुशस्त्र मिळवण्यापासून रोखण्यात आले, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.