वृत्तसंस्था, दुबई
इस्रायलने इराणविरुद्धची हवाई आघाडी आणखी विस्तारली असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही राजधानी तेहरानमधील नागरिकांना शहर सोडण्याचा इशारा दिल्याने गोंधळाची स्थिती आहे. हजारो नागरिक शहराबाहेर पडण्यास सुरुवात झाल्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. इस्रायली लष्करानेही तेहरानच्या सुमारे तीन लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यास सांगितले आहे. इस्रायलने मध्य तेहरानला लक्ष्य करण्याचा इशारा दिला असून या परिसरात सरकारी वृत्तवाहिन्या, पोलीस मुख्यालय आणि तीन मोठी रुग्णालये आहेत. गाझा आणि लेबनॉन या ठिकाणीही इशारे देऊन हल्ले चढविल्यामुळे इस्रायल मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
‘मोसाद’चे मुख्यालय लक्ष्य?
इस्रायलची गुप्तचर संस्था, ‘मोसाद’चे तेल अविवमधील मुख्यालय यशस्वीरित्या लक्ष्य केल्याचा दावा मंगळवारी इराणी लष्कराने केला. तसेच शहरातील लष्करी गुप्तहेर संचालनालयाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे ‘इराणी रिव्हॉल्युशनरी गार्ड’चे म्हणणे आहे.
सर्वसामान्यांचे बळी
इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यात आतापर्यंत २२४ जण ठार, तर १ हजार २७७ जण जखमी झाल्याची माहिती आहे. इराणनेही इस्रायलवर ३७० क्षेपणास्त्रे डागली असून इस्रायलमध्ये २४ नागरिकांचा बळी गेला असून पाचशेहून अधिक जखमी आहेत.
तेहरान शहर रिकामे करा. इराणला कधीही अण्वस्त्रसज्ज होऊ दिले जाऊ शकत नाही. मात्र तेहरानचे लोक सुरक्षित राहावेत, अशी माझी इच्छा आहे. इस्रायल-इराणमध्ये शस्त्रसंधी नव्हे, तर त्याहून अधिक चांगले काही तरी व्हावे, यासाठी ‘आमचे’ प्रयत्न सुरू आहेत. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका