Iran breaking news: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवरील अमेरिका–इस्रायल संयुक्त हल्ल्याची अधिकृत पुष्टी करत स्पष्ट केले की, इराणला त्यांच्या अणुसुविधांची पुनर्बांधणी करण्यापासून रोखण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती. आपल्या सोशल मीडियाच्या खात्यावरून व्हिडिओ शेअर करताना ट्रम्प म्हणाले, “इराण कधीही अण्वस्त्र बाळगू शकत नाही आणि गरज पडल्यास अमेरिका त्यांच्या अणुसुविधांचा पूर्णपणे नाश करेल.”

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, इराण आपला अणुकार्यक्रम पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळेच अमेरिका आणि इस्रायलला संयुक्त लष्करी कारवाई करावी लागली.

“शरणागती पत्करा”

डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्यांनंतर दिलेल्या संदेशात म्हटले की, “इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड, सशस्त्र दल आणि सर्व पोलिसांना मी आज रात्री आवाहन करतो की तुम्ही तुमची शस्त्रे खाली ठेवा आणि पूर्ण शरणागती पत्करा. अन्यथा तुम्हाला निश्चित मृत्यूला सामोरे जावे लागेल. त्यामुळे शस्त्रे खाली ठेवा, शरणागती स्वीकारल्यास तुमच्याशी पूर्ण संरक्षणासह वागणूक दिली जाईल.”

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पुढे स्पष्ट केले की, अमेरिका आपल्या नागरिकांच्या हितरक्षणासाठी कटिबद्ध आहे आणि इराणला कधीही अणुबॉम्ब विकसित करू दिला जाणार नाही. हे हल्ले इराणच्या अणुकार्यक्रमाचा पूर्णपणे नायनाट करण्याच्या उद्देशाने करण्यात आले असून, इराण पुन्हा एकदा तो कार्यक्रम उभा करण्याचा प्रयत्न करत आहे.

इराणमध्ये आणीबाणी जाहीर

अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढत असतानाच शनिवारी इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमध्ये हल्ला केला. असोसिएटेड प्रेस (एपी)च्या वृत्तानुसार, तेहरानमध्ये मोठा स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर इराणच्या संरक्षणमंत्र्यांनी देशभरात आणीबाणी जाहीर केली. इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनी यांच्या कार्यालयाजवळ हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. ८६ वर्षीय खामेनी त्या वेळी कार्यालयात उपस्थित होते की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. हल्ल्यानंतर इराणने आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले आहे.

दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर प्रतिबंधात्मक क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला आहे. या कारवाईमुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला असून युद्धाचे सावट पुन्हा गडद झाले आहे. विशेष म्हणजे, इराण आणि अमेरिका यांच्यात राजनैतिक तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच इस्रायलने ही लष्करी कारवाई केली आहे.