पीटीआय, वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी डॉ. जिल बायडेन यांनी सोमवारी ‘व्हाइट हाऊस’मध्ये दिवाळीनिमित्त विशेष स्वागत सोहळा साजरा केला. जॉर्ज बुश प्रशासनाच्या काळात ही प्रथा सुरू झाली. सोमवारी साजरा झालेला सोहळा हा आतापर्यंतचा सर्वात भव्य सोहळा ठरला.

या सोहळय़ासाठी दोनशेहून अधिक प्रतिष्ठित भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक ‘व्हाइट हाऊस’मधील ‘ईस्ट रूम’ येथे झालेल्या या सोहळय़ास उपस्थित होते. हे ठिकाण भारत-अमेरिकेशी संबंधित काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे. येथेच भारत-अमेरिकेदरम्यानच्या अणु करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. नोव्हेंबर २००८ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा व भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली होती. सोमवारी झालेल्या दिवाळी सोहळय़ात सितारवादक ऋषभ शर्मा आणि ‘द सा’ नृत्य समूहाच्या सादरीकरणासह काही आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. या वेळी भारतीय निमंत्रित नागरिक पारंपरिक साडी, लेहंगा आणि शेरवानी परिधान करून आले होते. या वेळी स्वादिष्ट भारतीय पदार्थाचा आस्वाद उपस्थितांनी घेतला.

‘यूएस इंडिया बिझनेस कौन्सिल’चे अध्यक्ष अतुल केशप यांनी सांगितले, की या सोहळय़ाचे सभागृह भारतीयांनी फुललेले आहे. भारतीय अमेरिकन समुदायाने अमेरिकेत ठसवलेल्या कर्तृत्वाचा हा खरा उत्सव आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि ‘व्हाइट हाऊस’ने आपल्या सर्वासाठी दिवाळी सोहळय़ाचे खास आयोजन करणे, ही भारतीय समुदायाच्या प्रतिष्ठेला मिळालेली मान्यता आहे. एक भारतीय अमेरिकन म्हणून या सोहळय़ास उपस्थित राहणे माझ्यासाठी बहुमानास्पद आहे. अमेरिकेतील सर्वात मोठय़ा दक्षिण आशियाई वाहिनी ‘टीव्ही एशिया’चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एच. आर. शाह यांनी सांगितले, की दिवाळी साजरी करण्यासाठी येथे येणे हा एक सन्मान आहे. भारतीय अमेरिकन नागरिकांतर्फे मी राष्ट्राध्यक्ष बायडेन व त्यांच्या पत्नी प्रथम महिला जिल बायडेन यांचे आभार मानतो.

  राष्ट्राध्यक्षांच्या आशियाई अमेरिकन, नेटिव्ह हवाईयन आणि पॅसिफिक आयलँडर्स सल्लागार आयोगाचे सदस्य अजय जैन भुटोरिया यांनी सांगितले, की आर्थिक विकास आणि कोविड संकटाचे व्यवस्थापनातील दक्षिण आशियाई समुदायाचे विशेष योगदानास अभिवादन करण्यासाठी, हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. बायडेन यांच्या प्रशासनात विविध स्तरांवर १३० हून अधिक विक्रमी संख्येने भारतीय अमेरिकन नियुक्त करण्यात आले आहेत. या सोहळय़ातून अध्यक्ष बायडेन व त्यांच्या प्रशासनाचा दक्षिण आशियाई समुदायावरील प्रेम व आदर अधोरेखित होतो.

दक्षिण आशियाई समुदायाचे महत्त्वाचे योगदान : बायडेन

पाहुण्यांचे स्वागत करताना बायडेन यांनी सांगितले, की व्हाइट हाऊसमध्ये एवढय़ा भव्य स्वरूपात होणारा हा पहिलाच दिवाळी स्वागत सोहळा आहे. अमेरिकेतील दक्षिण आशियाई समुदायाने करोना महासाथीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. आपल्या समुदायाची राष्ट्रसेवा व संरक्षणातील योगदान प्रेरणादायी आहे. अमेरिकेस अधिक बळकट होण्यास मदत केली आहे. बहुपयोगी अर्थव्यवस्था निर्माण केली. मनोरंजन, सेवाक्षेत्र, मुलांचे शिक्षण आणि ज्येष्ठांची काळजी घेतली.

बायडेन यांचा मुलांशी संवाद

‘व्हाइट हाऊस’च्या या दिवाळी सोहळय़ात अध्यक्ष जो बायडेन यांनी दोन मुलांना मंचावर आमंत्रित केले. प्रतिनिधिगृहाचे सदस्य रो खन्ना यांच्या या मुलांचे सोरेन व झारा नाव आहे. बायडेन यांनी त्यांना विचारले, की तुम्ही कसे आहात, तुम्हाला मंचावर यायचे आहे का? तुम्ही मंचावर माझ्यासोबत येऊ शकता. या वेळी बायडेन यांनी आपल्या सहकाऱ्यास या मुलांना घेऊन येण्यास सांगितले. मुलांना ‘प्रकाशाचे प्रतीक’ संबोधत ते माझ्यासाठी आशेचा किरण असल्याचे बायडेन यांनी सांगितले. हे या समारंभाचे वेगळेपण ठरले. हा आमचा सन्मान असल्याचे कृतज्ञतापूर्ण उद्गार रो खन्ना यांनी या वेळी काढले. व्हाइट हाऊसतर्फे सांगण्यात आले, की देशभरातील भारतीय समुदायातील सुमारे दोनशे सदस्य सोहळय़ाला उपस्थित होते.