पीटीआय, वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आर्थिक अरिष्टात सापडलेल्या पाकिस्तानला दुप्पट आर्थिक साहाय्य करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याअंतर्गत या आर्थिक वर्षांत पाकिस्तानला आठ कोटी २० लाख डॉलरची मदत दिली जाईल. पूरसंकटातून सावरण्यासाठी, विविध स्रोतांकडून ऊर्जापुरवठा मिळवण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी क्षमता निर्माण करण्यासाठी हा निधी दिला जाणार आहे.
पाकिस्तानला दिलेल्या मदतीमुळे खासगी क्षेत्राची आर्थिक वाढ होईल, लोकशाही संस्था मजबूत होतील आणि लिंग-समानता तसेच महिला सक्षमीकरण अधिक वाढेल अशी अपेक्षा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली. गेल्या वर्षी अमेरिकेने पाकिस्तानला तीन कोटी ९० लाख डॉलरची मदत केली होती. ती या वर्षी दुपटीहून अधिक असेल. त्याच्या जोडीला पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ आणि कायदा अंमलबजावणी श्रेणीमध्ये १ कोटी ७० लाख डॉलर मिळतील.
पाकिस्तानकडे सध्या जेमतेम तीन आठवडे पुरेल इतकेच चलन आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज मिळवण्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागत आहेत. हे कर्ज देण्यासाठी नाणेनिधीने पाकिस्तानसमोर महसूलवाढीसाठी आर्थिक शिस्त आणि कररचनेत बदल यासारख्या अनेक कठोर अटी ठेवल्या आहेत. त्यानुसार पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी नवी करप्रणाली जाहीर केली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबरोबर कर्जासाठी करार झाल्यावर पाकिस्तानला एक अब्ज २० कोटी डॉलर कर्ज मिळेल, त्याच्या जोडीला अनेक मित्र देशांकडून आर्थिक मदतीचा ओघ सुरू होईल.