US Israel Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या लष्करी कारवाईत आतापर्यंत इराणचं मोठं नुकसान झालं आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचाही मृत्यू झाला आहे. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांना इराण देखील मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तर देत प्रतिहल्ले करत आहे.
इराणने आखाती देशांवरही हल्ले केल्यामुळे आखाती देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र, अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यादरम्यान इराणमधील एका मुलींच्या शाळेवर मिसाईल डागण्यात होती. या हल्लात १०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला, या मृतांमध्ये सर्वाधिक शाळकरी मुलींची संख्या होती. या घटनेमुळे जगभरात संतापाची लाट उसळली होती. तसेच निष्पाप शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्यामुळे अनेक देशांनी निषेध व्यक्त केला.
दरम्यान, या युद्धात निष्पाप शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचे सिनेटर जॉन केनेडी यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुलींच्या शाळेवर हल्ला केला ती आमची चूक’, असं सिनेटर जॉन केनेडी यांनी म्हटलं आहे.
जॉन केनेडी काय म्हणाले?
“इतर देश जाणूनबुजून असं करतात, जसं की रशिया. मात्र, आम्ही जाणूनबुजून असं कधीच करणार नाही. मला वाटतं की संरक्षण विभाग आता त्याची चौकशी करत आहे. मला माफ करा. पण ते घडल्याबद्दल खूप वाईट वाटतं. ती एक आमची चूक होती”, असं सिनेटर जॉन केनेडी यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठं युद्ध संपवण्याचे संकेत
अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचे परिणाम जगातील अनेक देशांवर आता होत असून जगातील तेलाचा व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. असं असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे संकेत दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सांगितलं की इराणला लक्ष्य करण्यासाठी आता प्रत्यक्षात काहीही शिल्लक नाही आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापार व्यत्ययांमुळे कच्चे तेल आणि वायूच्या वाढत्या किमतींच्या चिंतेमुळे हे युद्ध लवकरच संपू शकतं असे संकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, “इराणशी सुरु असलेलं युद्ध लवकरच संपेल. कारण आता इराणमध्ये लक्ष्य करण्यासाठी व्यावहारिकदृष्ट्या काहीही शिल्लक नाही. थोडं फार काही शिल्लक असेल. त्यामुळे मी जेव्हा हे युद्ध संपवेल, तेव्हा ते संपेल”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे संकेत दिले आहेत की अमेरिका-इस्रायलने केलेल्या कारवाईत त्यांचं उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात साध्य झालं. त्यामुळे हे युद्ध लवकरच संपवू शकतं. मात्र, इस्रायली संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी बुधवारी म्हटलं की, हे युद्ध कोणत्याही वेळेच्या मर्यादेशिवाय आणि आवश्यकतेनुसार जोपर्यंत आमचं सर्व उद्दिष्टे साध्य करत नाही आणि ही मोहीम निर्णायकपणे जिंकत नाही तोपर्यंत हे युद्ध चालू राहील.”
