पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांची व्हाइट हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चेसाठी भेट घेतली. या भेटीदरम्यान बऱ्याच विषयांवर चर्चा झाल्या. यावेळी संयुक्त पत्रकार परिषदही झाली. या पत्रकार परिषदेमध्ये जो बायडेन यांनी अगदी हलक्या पुलक्या अंदाजामध्ये ‘भारतातील पाच बाडेन’ आणि ‘भारतीय महिलेशी लग्न करणारा’ बायडेन या विषयांवर भाष्य केलं आणि प्रेस कॉन्फरन्स सुरु असणाऱ्या हॉलमध्ये एकच हशा पिकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पत्रकारांशी बोलताना बायडेन यांना, मी यासंदर्भातील काही कागदपत्रं आणली आहेत. यांच्या मदतीने तुम्ही भारतातील बायडेन्सचा शोध घेऊ शकता, असं उत्तर दिलं. “मला पक्कं आठवत नाही पण मी १९७२ साली वयाच्या २८ व्या वर्षी सिनेटर म्हणून निवडून आलो तेव्हा मी शपथ घेण्याआधी मला मुंबईमधून बायडेन नावाच्या एका व्यक्तीचं पत्र आलं होतं. मला नंतर त्याच्याशी संवाद साधता आला नाही. पुढच्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये भारतीय पत्रकारांनी भारतात पाच बायडेन असल्याची माहिती दिली,” असं जो बायडेन यांनी म्हटलं. यावर मोदींनाही हसू आवरलं नाही.

पुढे मस्करीमध्ये बोलताना बायडेन यांनी, “मी मस्करीत सांगितलं की मला एका कॅप्टन जॉर्ज बायडेन बद्दल माहिती मिळाली असून ते इंडियन टी कंपनीमध्ये कामाला होते. शेवटी झालं असं की जॉर्ज बायडेन भारतात थांबले आणि त्यांनी भारतीय माहिलेशी लग्न केलं. मात्र मलानंतर याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळेच या बैठकीमध्ये मला याबद्दलची माहिती मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न केला,” अशी उपहासात्मक प्रतिक्रिया बायडेन यांनी दिली आणि पत्रकार हसू लागले.

“हा मस्करीचा भाग जाऊ द्या, पण जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक मजबूत, घनिष्ठ आणि दृढ होतील, यात शंका नाही” असं बायडेन नंतर म्हणाले.

मोदींनीही बायडेन यांच्या प्रतिक्रियेनंतर बोलताना, “तुम्ही बायडेन अडनावाबद्दल बोलत होता. तुम्ही यापूर्वीही मला याबद्दल सांगितलं आहे. मी यासंदर्भात काही कागदपत्र शोधण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यातली काही कागदपत्र घेऊन आलोय. ती तुम्हाला उपयोगी पडतील अशी आशा आहे,” असं सांगितलं. म्हणजेच मोदींनीही बायडेन यांच्या उपहासात्मक टीप्पणीवर प्रतिक्रिया देताना आपण यासंदर्भातील पुरावे आणल्याचा मजेशीर दावा केला. यावर बायडेन यांनी मस्करीमध्ये, मी सुटकेचा निश्वास सोडलाय, अशा अर्थाची प्रतिक्रिया दिली.

नक्की काय आहे हे प्रकरण?

डेमोक्रेटिकचे उमेदवार असणारे बायडेन हे २०१३ रोजी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी मुंबईमध्ये दिलेल्या एका भाषणामध्ये आपले भारताबरोबरचे खास नाते असल्याचे म्हटले होतं. बायडेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते १९७२ साली पहिल्यांदा निवडणूक जिंकले तेव्हा त्यांना मुंबईमधील एका बायडेन कुटुंबाने पत्र पाठवलं होतं. यापत्रामध्ये मुंबईकर बायडेन कुटुंबाने आपल्या दोन्ही कुटुंबांचे पूर्वज एकच असल्याचा उल्लेख केला होता. बायडेन कुटुंबाचे पूर्वज १८ व्या शतकामध्ये इस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करायचे असंही या पत्रामध्ये म्हटलं होतं. मात्र पुढे या पत्रावरुन आपण त्या कुटुंबाशी फारसा संवाद साधू शकलो नाही आणि याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळवता आली नाही असं सांगत जो बायडेन यांनी खेदही व्यक्त केला होता.

त्यानंतरही केला उल्लेख

अमेरिकेतील वॉशिंग्टनमधील एका इंडो-युएस फोरमच्या बैठकीमध्येही त्यांनी आपल्या भारताबरोबरच्या संबंधांचा उल्लेख केला होता. आमच्या एका पूर्वजाने भारतीय महिलेशी लग्न केलं असावं आणि आजही माझ्या कुटुंबाशी संबंध असणारे काही लोकं भारतात असतील असं बायडेन म्हणाले होते. त्यावेळी त्यांनी आपल्याला एका पत्रकाराने मुंबईत बायडेन अडनाव असलेले पाच लोकं आहेत अशी माहिती दिल्याचेही सांगितले होते. आपल्या भारताबद्दलच्या कनेक्शनसंदर्भात बोलताना त्यांनी मस्करीमध्ये, भविष्यात मी भारतातूनही निवडणूक लढवू शकतो असंही म्हटलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us president jokes about 5 bidens in india pm modi offers papers scsg
First published on: 25-09-2021 at 08:00 IST