Donald Trump Interview Walkout NBC News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एनबीसी वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत सध्या चर्चेत आहे. २०२० साली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत घोटाळा झाला होता, असे आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. या आरोपांबाबत महिला पत्रकार क्रिस्टन वेल्कर यांनी प्रश्न विचारले आणि त्या आरोपांबद्दल काही पुरावे आहेत का? अशी विचारणा केली. या प्रश्नावरून डोनाल्ड ट्रम्प चांगलेच संतापले. त्यांनी महिला पत्रकाराला भ्रष्ट आणि मूर्ख म्हटले, तसेच मुलाखत अर्धवट सोडून तिथून निघून गेले.
एनबीसी वाहिनीच्या मीट द प्रेस या कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची मुलाखत सुरू होती. यावेळी त्यांना २०२० च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील आरोपांबाबत विचारणा करण्यात आली. ट्रम्प यांनी आपल्या आरोपांचे पुन्हा एकदा समर्थन केले. मात्र पत्रकार वारंवार पुरावा मागत असल्यामुळे ट्रम्प संतापले.
नेमके काय घडले?
मुलाखतीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२० च्या निवडणुकीतील कॅलिफोर्नियाच्या मतमोजणीच्या गतीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, चार दिवस होऊनही मतमोजणी पूर्ण झाली नाही. निकाल समोर आला नव्हता. यावर मुलाखतकार वेल्कर म्हणाल्या की, यंत्रणेने मतमोजणीची जी प्रक्रिया ठरवली आहे, त्यानुसारच मतमोजणी सुरू होती. त्यात उशीर झाला.

यावर ट्रम्प उत्तरले की, मतमोजणीत झालेला उशीर हाच गैरप्रकाराचा मोठा पुरावा आहे. “तुम्हाला कल्पना आहे का त्यांनी ते का केले होते? कारण त्यांना निवडणुकीच्या निकालाशी छेडछाड करायची होती”, असा आरोप ट्रम्प यांनी केला.
यावर वेल्कर यांनी ट्रम्प करत असलेल्या आरोपांचा काही पुरावा आहे का? असा प्रश्न विचारला. यावर ट्रम्प म्हणाले की, त्यांना यात लक्ष घालावे लागेल आणि ते लोकांचे म्हणणे ऐकून घेतील.
यावर एनबीसीच्या पत्रकार आणि मुलाखतकार क्रिस्टन वेल्कर यांनी पुन्हा एकदा यावर प्रश्न उपस्थित करत अमेरिकेतील निवडणुकीत गडबड झाल्याचा एकही पुरावा आढळलेला नाही, असे म्हटले.
.@POTUS bodies @kwelkernbc on California's pathetic excuse for an election system:
— Rapid Response 47 (@RapidResponse47) June 7, 2026
"Do you think it's appropriate that they have an election and five days later they're nowhere close to picking a winner!? They're crooked — just like you're crooked." pic.twitter.com/a4gwNUm7gC
ट्रम्प यांनी मात्र आपला रोख कायम ठेवला. मतमोजणीला अधिक दिवसांचा काळ लागणे, हे निवडणुकीशी छेडछाड केल्याचेच उदाहरण आहे, यावर ते ठाम होते. “निवडणूक होऊन पाच दिवस झाले तरी तेथील अधिकारी विजेता कोण आहे? हे ठरवू शकले नव्हते. तुम्हाला हे योग्य वाटते का?”, असा प्रश्न ट्रम्प यांनी उपस्थित केला.
वेल्कर यांनी म्हटले की, कॅलिफोर्नियामधील मतमोजणीची प्रक्रिया धीम्यागतीने चालू होती. त्यावर संबंधित अधिकारी काम करत होते.
ट्रम्प यांची संपूर्ण वृत्तसमूहावर टीका
ट्रम्प आणि मुलाखतकार वेल्कर यांच्यातील वाद काही क्षणात वाढला. संतापलेल्या ट्रम्प यांनी कॅलिफोर्नियामधील निवडणूक अधिकारी भ्रष्ट असल्याचा आरोप केला. तसेच हे आरोप त्यांनी वेल्कर आणि काही माध्यम समूहांवरदेखील केले. “ते (अधिकारी) भ्रष्ट होते, त्याप्रमाणे तुम्हीही भ्रष्ट आहात. तुमचा माध्यम समूह भ्रष्ट आहे. मीट द प्रेस हा कार्यक्रमही तसाच आहे”, असा आरोप ट्रम्प यांनी केला.

ट्रम्प पुढे म्हणाले की, जेव्हा निवडणूक घेण्याचा विषय येतो तेव्हा अमेरिका तिसऱ्या जगातील देशाप्रमाणे भासतो. यावर वेल्कर यांनी ट्रम्प यांना उद्देशून म्हटले, “मी भ्रष्ट नाही.” यावर ट्रम्प म्हणाले की, तुम्ही एकतर भ्रष्ट आहात किंवा मूर्ख आहात.
यानंतर ट्रम्प यांनी एनबीसी, एबीसी, सीबीएस, सीएनएन आणि इतर माध्यम समूहांवर पक्षपातीपणाचा आरोप केला. तुम्ही सर्व भ्रष्ट आहात, मीट द प्रेस हा कार्यक्रमही बकवास आहे, असा आरोप ट्रम्प यांनी केला.
मुलाखत अर्ध्यातच सोडून गेले
वेल्कर यांच्याशी झालेल्या वादावादीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेतला. “माफ करा, आता बास झाले, मी पुढे मुलाखत देऊ शकत नाही. थँक यू डार्लिंग”, असे बोलून ट्रम्प यांनी शर्टाला लावलेला माईक काढला आणि ते मुलाखतीमधून उठून निघून गेले.
ट्रम्प मुलाखतीमधून उठून जात असताना वेल्कर यांनी त्यांना विनंती केली की, त्यांनी बराच प्रवास करून विस्कॉन्सिन गाठले आहे. मात्र यावरही ट्रम्प यांचे समाधान झाले नाही. त्यांनी म्हटले, “मी इथे तुमच्या बरोबर एक तास पावसात बसलो.” वेल्कर यांनी ट्रम्प यांना थांबण्याची विनंती केली, मात्र ट्रम्प यांनी आधीच पुरेसा वेळ दिला आहे, असे सांगितले. तसेच माध्यमांनी त्यांचे वार्तांकन सुधारावे, असा सल्लाही जाता जाता दिला.
? LMFAO!! PRESIDENT TRUMP TO KAITLAN COLLINS:
— Eric Daugherty (@EricLDaugh) June 3, 2026
"CNN has a corrupt reporter standing RIGHT THERE, she NEVER smiles. A young, beautiful woman — never smiles! I never see a smile on her face. I see her standing there with HATRED in her eyes, she has hatred because we have borders,… pic.twitter.com/e7xwN7SIbI
पत्रकारांबरोबरचा वाद नवा नाही
ट्रम्प यांनी माध्यमे किंवा पत्रकारांशी वाद घालण्याचे हे पहिले प्रकरण नाही. याआधीही त्यांचे अनेक पत्रकारांशी खटके उडाले आहेत. एनबीसी वाहिनीला मुलाखत देण्याआधी सीएनएनचे पत्रकार कॅटलिन कॉलिन्स यांच्याबाबतही ट्रम्प यांनी आक्षेप घेतला होता. तसेच सीएनएन ही भ्रष्ट संस्था असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
पत्रकार कॉलिन्स यांच्याबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले, “ती एक सुंदर, देखणी स्त्री आहे. पण ती कधीच हसत नाही. मला तिच्या डोळ्यांत द्वेष दिसतो.”
