अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दुसर्यांदा सत्तेत आल्यापासून त्यांच्या वेगवेगळ्या निर्णयांसाठी नेहमीच चर्चेत राहिले आहेत. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना न जुमानणारे फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्याविरोधात अमेरिकेतील फेडरल प्रॉसिक्युटर्सनी गुन्हेगारी चौकशी (Criminal Investigation) सुरू केल्याची बाब समोर आली आहे. पॉवेल यांनी रविवार (११ जानेवारी) रोजी जारी केलेल्या एका व्हिडीओमध्ये याबद्दल माहिती दिली आहे.
या व्हिडीओमध्ये पॉवेल म्हणाले की, अमेरिकेच्या न्याय विभागाने त्यांनी सिनेट कमिटीला दिलेल्या साक्षीनंतर फेडरल रिझर्व्हला Subpoena पाठवण्यात आली असून गुन्हेगारी आरोपपत्र दाखल करण्याची धमकी दिली आहे. Subpoena हा एक न्यायालयात पुरावा सादर करण्यासाठी हजर राहावे यासाठी देण्यात आलेला लेखी आदेश असतो. हे संपूर्ण प्रकरण फेडरल रिझर्व्हच्या मुख्यालयातील इमारतींच्या नूतनीकरणाशी संबंधित आहे.
पॉवेल यांनी युक्तीवाद केला आहे की, अपेक्षेनुसार व्याजदरात कपात करण्यास फेडरल रिझर्व्हने नकार दिल्याने डोनाल्ड ट्रम्प नाराज झाले आणि त्यामुळेच ही चौकशी केली जात आहे. दरम्यान या चौकशीबाबत प्रॉसिक्युटर्सनी अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही. मात्र यामुळे ट्रम्प आणि पॉवेल यांच्यातील वाद पुन्हा भडकण्याची चिन्हे आहेत. विशेष बाब म्हणजे, २०१७ मध्ये ट्रम्प यांनीच त्यांच्या पहिल्या कार्यकाळात पॉवेल यांची या पदावर नियुक्ती केली होती.
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह अमेरिकेतली इतर अनेक स्वायत्त संस्थांप्रमाणे प्रशासन आणि राष्ट्राध्यक्ष यांच्यापासून स्वतंत्र्य आपले व्याजदर निश्चित करण्याचे काम करत आली आहे. मात्र ट्रम्प यांच्या दुसर्या कार्यकाळात या संस्थेच्या स्वातंत्र्याला कठीण काळातून जावे लागत आहे. यानंतर आता फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल हे ट्रम्प यांच्या रागाचे लक्ष्य ठरले असून, त्यातूनच अमेरिकन न्याय विभागाकडून त्यांच्याविरूद्ध गुन्हेगारी तपास सुरू झाला आहे.
पॉवेल यांच्या चौकशीवर डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया येथील यूएस अटर्नी ऑफिसमार्फत देखरेख ठेवली जाईल, असे वृत्त द न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे.
“हे फेडरल रिझर्व्ह यापुढेही पुरावे आणि आर्थिक परिस्थितीवर आधारित व्याजरदर ठरवणार की मॉनिटरी पॉलिसी ही राजकीय दबाव किंवा दहशतीने नियंत्रित केली जाणार, याबद्दल आहे,” असेही पॉवेल त्यांच्या प्रतिसादात म्हणाले.
ट्रम्प यांनी यापूर्वीही वारंवार पॉवेल यांना काढून टाकण्याचा इशारा दिला आहे. वेगाने व्याजरदरात कपात न केल्याबद्दल ट्रम्प हे पॉवेल यांच्यावर वारंवार कडक शब्दांत टीका करत आले आहेत. विशेष म्हणजे, २०२५ च्या उत्तरार्धात फेडरल रिझर्व्हने तीन वेळा व्याजरदरात कपात केली होती.
