scorecardresearch

ड्रोनवरील हल्ल्याचा पुरावा अमेरिकेकडून जारी; रशियाने इंधन टाकल्याची चित्रफीत प्रसिद्ध

रशियाच्या विमानाने अमेरिकी हवाई दलाच्या टेहळणी ड्रोनवर इंधन टाकल्याच्या आणि त्याच्या चारपैकी एक पाते मोडल्याच्या मुद्दय़ावरून दोन्ही देशांमध्ये नवीन वाद सुरू आहे.

drone
(प्रातिनिधिक छायाचित्र – पीटीआय)

पीटीआय, कीव्ह

रशियाच्या विमानाने अमेरिकी हवाई दलाच्या टेहळणी ड्रोनवर इंधन टाकल्याच्या आणि त्याच्या चारपैकी एक पाते मोडल्याच्या मुद्दय़ावरून दोन्ही देशांमध्ये नवीन वाद सुरू आहे. त्याच संदर्भात पेंटागॉनने गुरुवारी ४२ सेकंदांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. ही घटना मंगळवारी काळय़ा समुद्राच्या हवाई हद्दीमध्ये घडली होती.

त्यामध्ये रशियाचे सु-२७ हे लढाऊ विमान अमेरिकेच्या एमक्यू-९ या ड्रोनच्या वरील बाजूला येताना आणि ड्रोनवर इंधन टाकताना दिसते. ड्रोनच्या दृश्यक्षमतेवर परिणाम करणे आणि ते त्या भागातून पिटाळून लावणे हा या कृत्यामागील हेतू असावा असे दिसते. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नामध्ये, रशियाच्या त्याच किंवा दुसऱ्या लढाऊ विमानाने ड्रोनचे पात्यांना (प्रोपेलर) धक्का दिला, त्यामध्ये एक पाते निकामी झाले असे अमेरिकेच्या सैन्यातर्फे सांगण्यात आले. या व्हिडीओमध्ये इंधन टाकण्याच्या आधी आणि नंतर काय झाले ते दिसत नाही.

रशियाच्या लढाऊ विमानाने या ड्रोनच्या मार्गात अडथळे आणल्यानंतर आपण ते समुद्रामध्ये पाडले अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, आपल्या लढाऊ विमानांनी हे ड्रोन खाली पाडले नाही असा दावा रशियाने केला, तसेच काळय़ा समुद्रावर घिरटय़ा मारल्यानंतर ते खाली पडले असे त्यांच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. या ड्रोनचे अवशेष मिळवण्याचा प्रयत्न करायचा का याचा निर्णय लष्करातर्फे घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले. तर रशियाला ड्रोनचे अवशेष मिळवण्यात यश आले तरीही त्यांच्यापर्यंत लष्करी मूल्य असलेली कोणतीही माहिती जाणार नाही, असा विश्वास अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

अमेरिका आणि रशियादरम्यान एकमेकांच्या हेरगिरीच्या कामात अडथळे आणण्याचे प्रकार नवीन नसले तरी युक्रेन युद्धामुळे अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये थेट संघर्ष उद्भवू शकतो, अशी भीती या घटनेतून निर्माण झाली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून बुधवारी अमेरिका आणि रशियाच्या वरिष्ठ संरक्षण आणि लष्करी अधिकाऱ्यांनी चर्चा केली. ऑक्टोबर २०२२ नंतर प्रथमच या पातळीवर थेट चर्चा झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 03:46 IST