वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
सुदानमधील संघर्षाला कथितरीत्या आर्थिक व लष्करी मदत पुरवणार्यांविरोधात अमेरिकेने कठोर कारवाई करत भारतीय नागरिक आलोक चौधरी आणि छत्तीसगडस्थित एसबीएल एनर्जी या कंपनीसह जगभरातील आठ व्यक्ती आणि संस्थांवर निर्बंध लादले आहेत.
अमेरिकेच्या वित्त विभागाच्या परदेशी मालमत्ता नियंत्रण कार्यालयाने ही कारवाई जाहीर केली. अमेरिकेने यापूर्वीच निर्बंध लादलेल्या सुदानमधील टार्गेट मल्टीॲक्टीव्हिटीज कंपनीला रायपूरस्थित एसबीएल एनर्जीने स्फोटके आणि संबंधित साहित्य पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या साहित्याचा वापर सुदानी लष्कराने बॉम्ब तयार करण्यासाठी केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
‘एसबीएल एनर्जी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक चौधरी यांच्यावर कंपनीचे प्रमुख म्हणून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या दाव्यानुसार २०२४ पासून भारतीय कंपनी ‘एसबीएल’ने सुदानी कंपनीला २०० हून अधिक स्फोटक साहित्याच्या खेपा पुरवल्या. दरम्यान निर्बंध लादलेल्यांमध्ये सुदान, पनामा आणि कोलंबियातील काही व्यक्ती आणि संस्थांचाही समावेश आहे.
या कारवाईमुळे संबंधितांची अमेरिकेतील मालमत्ता गोठवली जाणार असून अमेरिकन नागरिकांना त्यांच्याशी व्यवहार करण्यास मनाई असेल, असे अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी सांगितले.
