रॉयटर्स, दुबई / कैरो

अमेरिकेने इराणवरील हल्ले थांबविल्यानंतर पश्चिम आशियातील संघर्ष थांबल्याची शक्यता दिसत असताना अमेरिका आणि सौदी अरेबियाने बुधवारी इराकमधील इराणशी संलग्न बंडखोरांवर हल्ले केले. या हल्ल्यात २० जणांचा मृत्यू झाला. इराणनेही जॉर्डनमधील अमेरिकेच्या तळांवर आणि होर्मुझ सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या नौकांवर हल्ले केले. या नव्या संघर्षामुळे तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या.

‘आम्ही त्यांच्यावर जोरदार हल्ले करू,’ अशी धमकी देतानाच ‘आम्ही त्यांना चर्चाही करू देऊ,’ अशी वक्तव्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या नौकांच्या संयुक्त व्यवस्थापनाचा ओमानचा प्रस्ताव इराणने फेटाळला. सामुद्रधुनीतून जाणाऱ्या नौकांनी ऐच्छिक शुल्क द्यावे, असे या प्रस्तावात नमूद होते.

इराकमधील ‘पॉप्युलर मोबिलायजेशन फोर्सेस’ या निमलष्करी दलाला इराणचा पाठिंबा आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात किमान २० जण ठार आणि ३२ जण जखमी झाल्याचे या दलातील अधिकाऱ्यांनी सांगितले. इराकमधील अनेक तळांना अमेरिका आणि सौदी अरेबियाने लक्ष्य केले.

व्याप्ती वाढण्याचा धोका

इराणबरोबरील युद्धात अमेरिकेबरोबर हल्ले करण्याचा निर्णय सौदी अरेबियाने घेतल्याने या युद्धाची व्याप्ती वाढली आहे. सुन्नी विरुद्ध शिया अशी नवी आघाडी त्यामुळे तयार होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

इराककडून निषेध

अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या हल्ल्याचा इराकने निषेध केला असून, इराकच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याचा आरोप इराकच्या अध्यक्षांनी केला. तसेच, इराणविरोधातील लढाई थांबविण्याचेही आवाहन केले.

नौकांवरील हल्ल्यांचा भारताकडून निषेध

न्यूयॉर्क : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबाबत भारताने संयुक्त राष्ट्रसंघामध्ये चिंता व्यक्त केली असून, होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये व्यावसायिक नौकांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आहे. आंतरराष्ट्रीय समुद्रातून खुली सागरी वाहतूक पूर्ववत व्हावी, असे आवाहन भारताने केले. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे कायमचे प्रतिनिधी पी. हरिश यांनी ‘यूएन’मध्ये भारताची पश्चिम आशियाबाबत भूमिका मांडली.

‘होर्मुझ’ला ‘बाब अल मंदेब’चा पर्याय

सिंगापूर : होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यावसायिक नौकांनी ‘बाब अल मंदेब’ या सामुद्रधुनीतून जाण्याचा मार्ग निवडला आहे. या सामुद्रधुनीतून मंगळवारी ३९ नौका मार्गस्थ झाल्या. बुधवारी पाच नौका मार्गस्थ झाल्या. जहाजनोंदणी करणाऱ्या माहितीमधून ही आकडेवारी समोर आली आहे. बुधवारी मार्गस्थ झालेल्या नौकांमध्ये दोन नौका या तेलाची वाहतूक करणाऱ्या आणि अधिक क्षमतेच्या होत्या. दरम्यान, या मार्गाने नौका जाऊ देण्यासाठी चीन येमेनमधील हुती बंडखोरांशी थेट चर्चा करीत असल्याचे वृत्त आहे. हुती बंडखोरांनी सौदी अरेबियाविरोधात नाविक कोंडी लागू केली आहे.