‘‘व्हेनेझुएलामध्ये लष्कराची मोहीम अद्याप सुरू आहे. त्यामुळे व्हेनेझुएलामध्ये पुढे काय होईल किंवा काय करायचे, त्याच्या अटी आम्ही ठरवू,’’ असे अमेरिकेचे गृहसुरक्षा सल्लागार स्टीफन मिलर यांनी सांगितले.

व्हेनेझुएलामधील प्रशासन आणि इतर कारभाराबाबत मिलर यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ’‘व्हेनेझुएलावर आमचे तेलनिर्बंध आहेत. कुठल्याही प्रकारचा व्यापार करण्यासाठी त्यांना आमची परवानगी लागेल. आमचा सुरक्षेचा मोठा ताफा तिथे आहे. आमचे आरमार अद्यापही तिथे आहे.”

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हेनेझुएलाबाबत निर्णय अमेरिकेसाठीचा एक मोठा धोरणात्मक बदल आहे. अमेरिकेच्या इतिहासातील विजय आणि राष्ट्रशक्तीचे संतुलन आता होत आहे. ट्रम्प यांनी पररराष्ट्रमंत्री रुबिओ यांना या संदर्भातील पुढील अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. अनेक घटकांचा त्यात समावेश असतो. ऊर्जा धोरण, अर्थ धोरण, महसूल धोरण, लष्करी धोरणांचा समावेश आहे, अशी माहिती मिलर यांनी

आम्हाला व्हेनेझुएला सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळत आहे. त्यामुळे व्हेनेझुएलामधील नागरिक आतापर्यंत कधीही झाले नसतील, इतके श्रीमंत होतील. अमेरिकेलाही आर्थिक, सुरक्षा आणि लष्करी सहकार्याच्या पातळीवर अनेक लाभ होणार आहेत. – स्टीफन मिलर, गृहसुरक्षा सल्लागार, अमेरिका

अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये केलेला हस्तक्षेप हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे, हे जागतिक समुदायाने स्पष्ट केले पाहिजे. अमेरिकेच्या या कृतीमुळे जग आज कमी सुरक्षित झाले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने यावर एकत्र येऊन एका आवाजात बोलले पाहिजे.- रवीना शमदासनी, ‘यूएन’ मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालय

ग्रीनलँडच्या बचावासाठी युरोपीय नेते एकत्र

कोपनहेगन : ‘‘अमेरिकेने ग्रीनलँडवर ताबा मिळविला, तर नेटो लष्करी संघटना समाप्त होईल,’’ असा इशारा डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी दिला. फ्रेडरिक्सन यांच्या वक्तव्याला फ्रान्स, जर्मनी, इटली, पोलंड, स्पेन आणि ब्रिटननेही पाठिंबा दिला. ग्रीनलँड तेथील जनतेचे असल्याचे निवेदन या नेत्यांनी प्रसिद्ध केले. व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर नियंत्रण मिळविण्याची धमकी दिली आहे.